२६ दुकानांवर कारवाई; सव्वा लाखाचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:03 AM2021-05-22T04:03:22+5:302021-05-22T04:03:22+5:30
औरंगाबाद : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमध्येही चालू असलेल्या दुकानांवर शुक्रवारी जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांसह ...
औरंगाबाद : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमध्येही चालू असलेल्या दुकानांवर शुक्रवारी जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांसह पथकाने काही दुकाने सील करण्याची कारवाई करीत २६ दुकानांना दंड आकारला.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी दुकाने व आस्थापना नियमांचे पालन करीत नसल्याचे निदर्शनास आल्याने शुक्रवारी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी सकाळपासूनच शहराच्या विविध भागांत संयुक्त मोहीम राबविली. जालना रोड, शाहगंज, किराडपुरा या शहरी भागात दोन्ही अधिकारी रस्त्यावर उतरले. तसेच वाळूज महानगरातील बजाजनगर भागातही दुकाने सील करण्याची कारवाई करण्यात आली. जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांच्या मदतीला महापालिकेचे पथक होते.
कारवाईआधी सकाळी नऊ वाजता कामगार उपाआयुक्त, महापालिका व महसूल अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत विशेष भरारी पथके तयार करून कारवाईचे आदेश दिले. या बैठकीनंतर दोन्ही अधिकाऱ्यांनी शहरातील शहागंज, किराडपुरा, जालना रोड, बजाननगर अशा अनेक ठिकाणी पाहणी करून कारवाई केली. २६ पैकी १६ दुकानांकडून सव्वा लाख रुपयांचा दंड शुक्रवारच्या कारवाईत वसूल करण्यात आला.