तेरा मटकाबहाद्दर तडीपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 01:23 AM2017-10-29T01:23:01+5:302017-10-29T01:23:07+5:30
शहरात अवैधरीत्या मटका चालवून अनेकांचे संसार उद्ध्वस्त करणाºया तेरा जणांना पोलीस अधीक्षकांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम ५५ अंतर्गत जिल्ह्यातून एका वर्षासाठी तडीपार केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरात अवैधरीत्या मटका चालवून अनेकांचे संसार उद्ध्वस्त करणाºया तेरा जणांना पोलीस अधीक्षकांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम ५५ अंतर्गत जिल्ह्यातून एका वर्षासाठी तडीपार केले आहे. संघटित गुन्हेगारी करणाºयांविरुद्ध करण्यात आलेली अशा प्रकारची जिल्ह्यातील ही पहिलीच कारवाई असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
पोलिस सूत्रांनी सांगितले, की शहरात मटका किंग म्हणून ओळख असलेला शिवलिंगअप्पा वीर व कमलकिशोर पुसाराम बंग या दोघांनी मटका चालविणाºयांची टोळी एकत्र करून शहरात अवैध मटका अड्डे सुरू केले होते. त्यामुळे अनेक बेरोजगार तरुण जुगार व मटका खेळताना पैसे हरल्याने गुन्हेगारीकडे वळत असल्याचे जालना पोलिसांच्या निदर्शनास आले. सामाजिक जबाबदारी म्हणून पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी मटका बहाद्दरांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना दिले होते. गौर यांनी जिल्ह्यातील मुंबई जुगार कायद्यान्वये दाखल गुन्ह्यांचा अभिलेख संकलित केला. त्याचे विश्लेषण जुगार चालविणाºयांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ६५ अंतर्गत प्रस्ताव तयार करून पोलीस अधीक्षकांना सादर केला होता. या प्रस्तावाचे अवलोकन करून पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणात उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी यांचा स्वयंस्पष्ट अहवाल मागितला होता. बारी यांनी गौर यांच्या अहवालास अनुरुप अहवाल सादर केला. प्राप्त अहवालाच्या आधारे पोलीस अधीक्षकांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये वरील प्रतिवाद्यांना दोन वर्षांकरिता जालना जिल्ह्यातून हद्दपार का करण्यात येऊ नये, अशी नोटीस बजावली. तसेच त्यांच्या कायदेशीर सल्लागारामार्फत बाजू मांडण्याची संधी दिली होती. त्या वेळी पुन्हा असे गुन्हे करणार नाही, असे हमीपत्र संबंधितांनी सादर केले. मात्र, तरीही या प्रकरणाची चौकशी सुरू असताना शहरात मटका अड्डा चालविल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी त्यांना जिल्ह्यातून एक वर्ष हद्दपारीची कारवाई केली.
सांगलीनंतर जालना जिल्ह्यात झालेली ही पहिलीच कारवाई असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. १३ पैकी दहा जणांना स्थानिक गुन्हे शाखेने हद्दीपारीची नोटीस बजावून त्यांना मुंबई, बीड, सेलू, औरंगाबाद, देऊळगावराजा, देऊळगावमही, सिंदखेडराजा येथे नेऊन सोडले आहे. या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, अप्पर पोलीस अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, उपनिरीक्षक चैनसिंग घुसिंगे, हरीष राठोड, फुलसिंग घुसिंगे, भालचंद्र गिरी यांनी पुढाकार घेतला.