औरंगाबादेत वाहतूक शाखा आणि आरटीओकडून २१३ बेशिस्त रिक्षाचालकांविरोधात कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 01:45 PM2018-11-24T13:45:35+5:302018-11-24T13:46:39+5:30

या कारवाईत वाळूज आणि छावणी, सिडको, शहर वाहतूक विभागांतर्गत २१३ रिक्षा जप्त करण्यात आल्या. 

Action against 213 undisciplined auto drivers from the traffic branch and RTO in Aurangabad | औरंगाबादेत वाहतूक शाखा आणि आरटीओकडून २१३ बेशिस्त रिक्षाचालकांविरोधात कारवाई

औरंगाबादेत वाहतूक शाखा आणि आरटीओकडून २१३ बेशिस्त रिक्षाचालकांविरोधात कारवाई

googlenewsNext

औरंगाबाद : महावीर चौकात वाहतुकीला अडसर ठरेल अशा प्रकारे रिक्षा उभ्या करणाऱ्या रिक्षाचालकांच्या छायाचित्रांसह ‘लोकमत’ने शुक्रवारी वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत वाहतूक विभाग आणि प्रादेशिक परिवहन विभागाने शुक्रवारी दिवसभर विविध रस्त्यांवर बेशिस्त आणि नियम तोडून वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात कारवाई केली. या कारवाईत वाळूज आणि छावणी, सिडको, शहर वाहतूक विभागांतर्गत २१३ रिक्षा जप्त करण्यात आल्या. 

शहरातील अत्यंत महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या महावीर चौक (बाबा पेट्रोल पंप) येथून प्रवासी वाहतूक करणारे रिक्षाचालक मनमानी पद्धतीने वागतात, ते रस्त्यावर रिक्षा उभ्या करून वाहतुकीला अडथळा निर्माण करतात. वाहतूक पोलिसांनाही रिक्षाचालक जुमानत नसल्याचे वृत्त ‘लोकमत’ने शुक्रवारी प्रकाशित केले. या वृत्ताची गंभीर दखल वाहतूक शाखा आणि प्रादेशिक परिवहन विभागाने घेतली. दोन्ही विभागांनी संयुक्तपणे  शुक्रवारी सकाळपासून महावीर चौकात मोहीम राबवून बेशिस्त ४८ रिक्षा जप्त केल्या. वाळूज विभागातही तब्बल ४७ रिक्षांवर कारवाई केली. या सर्व रिक्षा छावणी ठाण्याच्या आवारात नेऊन उभ्या केल्या.

छावणी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, सहायक निरीक्षक खटाणे, आरटीओ निरीक्षक श्रीमती भामरे यांनी रिक्षाचालकांचे लायसन्स, बॅच, परमिट, रिक्षाचा विमा, पीयूसीसह अन्य कागदपत्रांची पडताळणी केली. या पडताळणीत किरकोळ नियम मोडणाऱ्या ३२ रिक्षाचालकांना वाहतूक शाखेने दंडात्मक कारवाई करून सोडून दिले, तर अन्य रिक्षा जप्त करून रिक्षामालकांना सोमवारी आरटीओ कार्यालयात हजर राहण्याचे आदेशित केले. शहर विभाग क्रमांक-२ मध्ये पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज यांनी ४० रिक्षा जप्त करून मध्यवर्ती बसस्थानक येथे उभ्या करून ठेवल्या, तर विभाग क्रमांक-१ मध्ये पोलीस निरीक्षक भारत काकडे यांनी ३९ रिक्षा जप्त केल्या.  सिडको विभागात निरीक्षक गिरमे आणि अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांनी ३७ रिक्षांवर कारवाई केली. 

रिक्षाचालकांची बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही
आज जप्त केलेल्या रिक्षांपैकी ज्या रिक्षांची कागदपत्रे नाहीत, त्या भंगारात काढून रस्त्यावरून कायमस्वरूपी हटविल्या जातील. शिवाय अन्य रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करून रिक्षा मुक्त केल्या जातील. रिक्षाचालकांची बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही.
- भारत काकडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा

 

Web Title: Action against 213 undisciplined auto drivers from the traffic branch and RTO in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.