कुख्यात गुंड मोहम्मद इम्रानवर एमपीडीएखाली कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:33 AM2020-12-17T04:33:28+5:302020-12-17T04:33:28+5:30
औरंगाबाद: वर्षभरापासून फरार असलेल्या कुख्यात गुन्हेगार मोहम्मद इम्रान मोहम्मद लतीफ (वय २१, रा. रवींद्रनगर, कटकट गेट) याला शहर पोलिसांनी ...
औरंगाबाद: वर्षभरापासून फरार असलेल्या कुख्यात गुन्हेगार मोहम्मद इम्रान मोहम्मद लतीफ (वय २१, रा. रवींद्रनगर, कटकट गेट) याला शहर पोलिसांनी महाराष्ट्र झोपडपट्टी दादा प्रतिबंधक अधिनियमानुसार(एमपीडीए) हर्सूल कारागृहात १५ डिसेंबर रोजी स्थानबद्ध केले.
मोहम्मद इम्रान याच्याविरुध्द खुनाचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत करणे, लूटमार, शस्त्राचा धाक दाखविणे आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या वाढत्या गुन्हेगारीचा आलेख लक्षात घेऊन पोलिसांनी त्याच्यावर हद्दपारीची कारवाई केली होती. यानंतरही तो गुन्हे करीत असल्याचे दिसून आले. आरोपी पोलिसांना आणि कायद्याला जुमानत नसल्यामुळे पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त सुरेश वानखेडे, निरीक्षक अनिल गायकवाड, जिन्सी ठाण्याचे निरीक्षक व्ही. एम. केंद्रे, पोलीस उपनिरीक्षक दत्ता शेळके, हवालदार द्वारकादास भांगे, नाना हिवाळे आणि महादेव दाणे यांच्या पथकाने त्याच्यावर एमपीडीएची कारवाई केली. तत्कालीन पोलीस आयुक्त यांनी २३ डिसेंबर २०१९ रोजी त्याच्या एमपीडीएचे आदेश जारी झाल्यापासून आरोपी इम्रान फरार झाला होता.
चौकट
नेकनूर पोलिसांनी पकडल्यावर घेतले ताब्यात
एमपीडीएची कारवाई टाळण्यासाठी इम्रान गतवर्षीपासून फरार झाला होता. दरम्यान, लूटमारीच्या गुन्ह्यात नेकनुर (जि. बीड )पोलिसांनी त्याला अटक केली. याविषयी माहिती मिळताच शहर पोलिसांनी न्यायालयाकडून परवानगी घेऊन त्याला अटक केली आणि त्याची रवानगी हर्सूल कारागृहात केली.