बंद पाकिटात दिले होते ‘कोम्बिंग’चे ‘टार्गेट’; औरंगाबादेत PFI कार्यकर्त्यांवर अशी झाली कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 06:45 PM2022-09-28T18:45:24+5:302022-09-28T18:45:52+5:30

संशयितांना ताब्यात घेण्यासाठी निघताना पथकाला बंद पाकिटात ‘टार्गेट’ दिले. त्याचवेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी काही अधिकारी राखीव ठेवले होते.

Action against PFI workers in Aurangabad; The 'Target' of 'Combing' was given in a closed envelope | बंद पाकिटात दिले होते ‘कोम्बिंग’चे ‘टार्गेट’; औरंगाबादेत PFI कार्यकर्त्यांवर अशी झाली कारवाई

बंद पाकिटात दिले होते ‘कोम्बिंग’चे ‘टार्गेट’; औरंगाबादेत PFI कार्यकर्त्यांवर अशी झाली कारवाई

googlenewsNext

औरंगाबाद : ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’शी संबंधित असलेल्या १४ जणांना ताब्यात घेण्याची कामगिरी औरंगाबाद पोलिसांनी अत्यंत गोपनीय पद्धतीने पार पाडली. संशयितांना ताब्यात घेण्यासाठी निघताना या पथकाला ‘टार्गेट’विषयी बंद पाकिटातून माहिती देण्यात आली. सोपविलेली कामगिरी पूर्ण झाल्यानंतर शहर पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकारी रात्रभर जागून सकाळी ८ वाजेच्या सुमारास घरी गेल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राष्ट्रीय तपास संस्थांच्या माहितीनुसार शहरातील १४ जण ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’शी संबंधित आहेत. राज्यात ही संख्या सर्वाधिक असून, औरंगाबाद शहर संवेदनशील असल्यामुळे ताब्यात घेताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी चिंता होती. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी १४ जणांना ताब्यात घेण्यासाठी गोपनीय पद्धतीने नियोजन केले. संशयितांना ताब्यात घेण्यासाठी निघताना पथकाला बंद पाकिटात ‘टार्गेट’ दिले. त्याचवेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी काही अधिकारी राखीव ठेवले होते. पाठविलेल्या ‘टीम’ने दिलेले ‘टार्गेट’ वेळेपूर्वी पूर्ण करीत कामगिरी फत्ते केली.

गुप्तचर यंत्रणेकडून (आयबी) मिळालेल्या माहितीनुसार, ‘पीएफआय’शी संबंधित १४ जणांना ताब्यात घेण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला. त्यासाठी ‘आयबी’चे आठ अधिकारी शहरात दाखल झाले होते. या ‘ऑपरेशन’ची माहिती आयुक्तांशिवाय इतरांना नव्हती. पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी विश्वासू अधिकाऱ्यांना सोबत घेत ‘मायक्रो प्लॅनिंग’ केले. सोमवारी (दि. २६) रात्री ८ वाजता आयुक्तांनी शहर पोलीस उपायुक्त अपर्णा गिते, उज्ज्वला वनकर, दीपक गिऱ्हे, सहायक पोलीस आयुक्त विशाल ढुमे, अशोक थोरात, पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, प्रमोद कठाणे, गौतम पातारे आदींसोबत बैठक घेतली. ही बैठक उशिरापर्यंत चालली. कोणाला कोणते ‘टार्गेट’ द्यायचे, कोणत्या ठिकाणी पाठवायचे, ताब्यात घेताना काय करायचे याविषयीच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्याशिवाय बेगमपुरा, क्रांती चौक, सीटी चौक, एमआयडीसी, सिडको आणि जिन्सी ठाण्यांचे निरीक्षक आणि विशेष पथकांना कारवाईमध्ये सहभागी करून घेण्यात आले होते. ताब्यात घेण्यात येणाऱ्या संशयितांसाठी स्वतंत्र पथक नेमले होते. त्यात गुन्हे शाखेचे चार अधिकारी, एनडीपीएस, अवैध मद्य विरोधी पथकाच्या प्रमुखांसह विविध पोलीस ठाण्यातील तीन पथकांचा समावेश होता. पोलीस आयुक्तांची बैठक झाल्यानंतर ‘ऑपरेशन’मध्ये सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांना याविषयी सांगण्यात आले, मात्र संबंधितांना गाड्या निघताना एक पाकीट देण्यात आले होते. कामगिरी पूर्ण झाल्यानंतर ताब्यात घेतलेल्यांना कोठे ठेवायचे याच्याही सूचना होत्या. त्यानंतर संबंधित पथकांनी निघून जाण्याचेही आदेश देण्यात आले होते.

निघतानाच मोबाईल घेतले ताब्यात
संशयितांना ताब्यात घेण्यासाठी मध्यरात्री अडीचच्या सुमारास पथके रवाना झाली. कारवाईला जाताना त्यांचे मोबाईल ताब्यात घेऊन एका पिशवीत ठेवण्यात आले. त्यामुळे त्यांना कारवाईदरम्यान कोणीही संपर्क साधू शकले नाही. या पथकाला दिलेल्या बंद लिफाफ्यात कोणत्या संशयिताला ताब्यात घ्यायचे, त्याची सविस्तर माहिती, पत्ता होता.

प्रत्येक टीमसोबत स्वतंत्र व्यक्ती
संशयिताचे घर, त्यांच्या घराचा पत्ता, ठिकाण याविषयीची सविस्तर माहिती असलेली एक व्यक्ती ‘टीम’सोबत होती. या व्यक्तीने संबंधित ‘टीम’ला घरापर्यंत नेले. घराचा दरवाजा ठोठावून संशयितास बाहेर बोलाविले व ताब्यात घेतले. त्यामुळे संशयिताच्या शेजाऱ्यांनाही कारवाईची माहिती झाली नाही.

‘ऑपरेशन फोर्स’ अन् ‘लॉ अँड ऑर्डर’ पथके
या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये ‘ऑपरेशन फोर्स’ आणि ‘लॉ अँड ऑर्डर’ची अशी स्वतंत्र पथके नेमली होती. कारवाईदरम्यान कोणती अडचण निर्माण झाल्यास त्याच्या मदतीसाठी ‘लॉ अँड ऑर्डर’ची टीम सज्ज होती. त्याचबरोबर पोलीस ठाण्यांच्या विशेष पथकांना हद्दीमध्ये नाकाबंदीसाठी तैनात केले होते. त्यामुळे सर्वत्र पोलिसांचा संचार सुरू होता.

एक तासात मोहीम फत्ते
‘टार्गेट’साठी नेमलेल्या ‘टीम’ आयुक्तालयातून मध्यरात्री अडीचच्या सुमारास निघाल्या. टार्गेटपर्यंत त्या तीनच्या सुमारास पोहोचल्या. या टीमने चारपूर्वी मोहीम फत्ते करून सांगितलेल्या ठिकाणी संशयितांना आणले.

‘आयबी’चे आठ अधिकारी सहभागी
शहर पोलिसांच्या ऑपरेशनमध्ये ‘आयबी’चे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांसह इतर सात अधिकारी सहभागी झाले होते. या अधिकाऱ्यांनीच संशयितांची नावे दिली होती. त्यानुसार शहर पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्याची चौकशी ‘आयबी’च्या अधिकाऱ्यांनी केली. त्यानंतर संबंधितांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. त्यातील चारजणांच्या नावावर आंदोलनाचे १२ गुन्हे दाखल असल्यामुळे प्रतिबंधात्मक कारवाईमध्ये स्थानबद्ध करण्याचे आदेश मिळाले. त्यानुसार शहर पोलिसांनी कारवाई केली.

१४ पैकी एकजण प्रदेशाध्यक्ष
शहर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या १४ जणांपैकी एकजण असलेला सय्यद कलीम सलीमभाई छोटे ‘पीएफआय’शी संबंधित ‘एसडीपीआय’चा प्रदेशाध्यक्ष असल्याची माहितीही सूत्रांनी दिली. उर्वरित १३ जण हे ‘पीएफआय’च्या विविध पदांवर कार्यरत आहेत. या ताब्यात घेतलेल्यांमध्ये बहुतांश जण छोटे व्यावसायिक असल्याचेही चौकशीत समोर आले आहे.
 

 

Web Title: Action against PFI workers in Aurangabad; The 'Target' of 'Combing' was given in a closed envelope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.