चढ्या भावाने खत विक्री करणाऱ्यांना दणका; सिल्लोडमध्ये दोन दुकानांचे परवाने निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 07:23 PM2022-06-13T19:23:22+5:302022-06-13T19:23:32+5:30
यापुढेही अचानक भेटी देऊन अशीच कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पथकाने दिला
सिल्लोड: शेतकऱ्यांना चढ्या भावाने खत विक्री करणाऱ्या दुकानदारांना जिल्हा परिषद आणि कृषी विभागाच्या पथकाने चांगलाच दणका दिला. चढ्या भावाने खत विक्री केल्याचे निष्पन्न झाल्याने रविवारी पथकाने कारवाई करत शहरातील दोन दुकानांचे परवाने निलंबित करण्याची कारवाई केली.
शहरात चढ्या भावाने खत विक्री होत असल्याची माहिती मिळाल्याने रविवारी कृषी विभागाच्या पथकाने बनावट ग्राहक पाठवून छापा मारून दुकानदारांना चढ्या भावाने खत विक्री करताना पकडले व दोन दुकान चालकांचे परवाने निलंबित केले. परवाने निलंबीत करण्यात आलेल्या दुकानांची नावे कालिका कृषी सेवा केंद्र व एकता ऍग्रो अशी आहेत. ही कारवाई औरंगाबाद येथील जिल्हा परिषदचे अधिकारी दीपक गवळी, संतोष चव्हाण जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक, संतोष भालेराव कृषी अधिकारी पंचायत समिती सिल्लोड यांच्या पथकाने केली.
बनावट ग्राहक पाठवून केली खात्री
पथकाने कृषी सेवा केंद्रांची तपासणी केली. बनावट शेतकरी ग्राहक म्हणून दुकानावर पाठवून खतांची चढ्या दराने विक्री होत असल्याची शहानिशा केली. दरम्यान, कालिका कृषी सेवा केंद्र व एकता ऍग्रो सिल्लोड या दुकानांवर जास्त दराने खतांची विक्री होत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले. यापुढेही अचानक भेटी देऊन अशीच कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पथकाने दिला आहे.