योगा विभागाच्या योगा-योगवर होणार कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 11:15 PM2019-05-27T23:15:02+5:302019-05-27T23:15:45+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील योगशास्त्र विभागात कॉपी करण्यासाठी परीक्षा केंद्र बदलण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला होता. या प्रकारानंतर संबंधित दोषींवर कारवाई करण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत असतानाच, जाण्यापूर्वी दोषींवर कारवाई करणार असल्याचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी सोमवारी स्पष्ट केले.
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील योगशास्त्र विभागात कॉपी करण्यासाठी परीक्षा केंद्र बदलण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला होता. या प्रकारानंतर संबंधित दोषींवर कारवाई करण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत असतानाच, जाण्यापूर्वी दोषींवर कारवाई करणार असल्याचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी सोमवारी स्पष्ट केले.
विद्यापीठातील योगा विभागातील अभ्यासक्रमाची परीक्षा नाट्यशास्त्र विभागात घेण्याचे नियोजन केले होते. मात्र ऐनवेळी ही परीक्षा फाईन आर्ट विभागात हालविण्यात आली. यासाठी विद्यापीठ प्रशासन, परीक्षा विभागालाही कळविण्यात आले नव्हते. विशेष म्हणजे योगाचे विभागप्रमुख डॉ. स्मिता साबळे यांनाही याविषयी माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच त्यांनी आपण नाट्यशास्त्र विभागाच्या परीक्षेत व्यस्त असल्यामुळे योगा विभागाच्या परीक्षेकडे गेलो नसल्याचे सांगितले. त्यामुळे योगा विभागाच्या परीक्षा कोणी घेतल्या? असा प्रश्न निर्माण झाला आहे. योगा विभागाचे विद्यार्थी असलेले नाट्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. जयंत शेवतेकर हेच सर्व निर्णय घेत असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले. त्यांना कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी बोलावून घेऊन घडलेल्या प्रकारावर स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत. याविषयी बोलताना डॉ. चोपडे म्हणाले, घडलेला प्रकार गंभीर आहे. त्या विभागाचा प्रमुख म्हणून ज्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली होती, त्यांनी ती पार पाडली नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. त्यामुळे त्या विभागाला सक्षम विभागप्रमुख नेमण्यात येईल. तसेच सामूहिक कॉपीप्रकरणी तपासणी सुरू आहे. त्यात सर्वांनीच कॉपी केल्याचे स्पष्ट झाल्यास फेरपरीक्षा घेण्याचाही निर्णय घेण्यात येईल, असेही कुलगुरू डॉ. चोपडे यांनी स्पष्ट केले.
चौकशीला विलंब का?
योगा विभागात घडलेल्या प्रकाराला दोन आठवडे पूर्ण झाले आहेत. तरीही प्रशासन अहवाल येईल, नंतर कारवाई केली जाईल, अशी उडवाउडवीची उत्तरे देत आहे. मात्र व्हीआयपी परीक्षार्थी असल्यामुळे प्रशासनावर दबाव येत असल्याची चर्चा सुरू आहे.
-------------