चिंचोर्डी येथे निवडणुकीच्या कारणावरून हाणामारी
By Admin | Published: October 21, 2014 01:44 PM2014-10-21T13:44:11+5:302014-10-21T13:44:11+5:30
तालुक्यातील चिंचोर्डी येथे निवडणुकीच्या कारणावरून दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता घडली.
कळमनुरी : तालुक्यातील चिंचोर्डी येथे निवडणुकीच्या कारणावरून दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता घडली. परस्परविरोधी तक्रारींवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
यात मधुकर मोतीराम कुरूडे यांच्या फिर्यादीवरून पांडुरंग खुडे, नागोराव खुडे, रामराव मस्के, रमेश करनोर, केशव घोटेकर, माधव घोटेकर, गुलाब खुडे, रमेश राऊत, हनुमान कुरूडे, सुभाष कुरुडे, कुंडलिक कुरूडे यांच्यासह १७ जणांविरुद्ध मारहाणीचा तसेच जिल्हाधिकार्यांच्या जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. मधुकर कुरूडे हा घरासमोर उभा असताना आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून बॅन्ड लावून विनापरवाना मिरवणूक काढली.
'सभापतीचे झाले काय? शिवसेनेचे झाले काय? खाली मुंडके वर पाय' अशी घोषणाबाजी केली. कुरूडे हे समजावत असताना जमावातील अनेकांनी शिवीगाळ करून त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना कुरूडे यांच्या घरासमोर घडली.
याच प्रकरणात नागोराव खुडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी मधुकर कुरूडे, अशोक मस्के, प्रभाकर कुरूडे, संतोष कुरूडे, गंगाधर कदम, देवीदास कुरूडे, भारत कुरूडे, दादाराव मस्के, प्रताप मस्के, लक्ष्मण मस्के, रमेश कुरूडे (सर्व रा. चिंचोर्डी) यांच्याविरुद्ध जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन व मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. नागोराव खुडे व इतर कार्यकर्ते काँग्रेसचे डॉ. संतोष टारफे हे निवडून आल्याने साखर वाटून आनंद व्यक्त करताना आरोपी गैरकायद्याची मंडळी जमवून त्यांच्यासमोर आले व शिवीगाळ करू लागले.
तुम्हाला काय देणेघेणे साखर का वाटता? असे म्हणाले. यावेळी खुडे त्यांना समजावत असताना प्रभाकर कुरूडे हा त्यांच्या अंगावर धावून आला. तसेच हातातील दगड डोळ्याच्या भुवईवर फेकून मारला. त्यानंतर आरोपी अशोक मस्के यानही त्यांच्या मनगटावर काठीने मारहाण करून मुक्कामार दिला, असे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोनि रविकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संदेश चकोर, सूर्य शालिनी जाधव हे करीत आहेत. (वार्ताहर)