‘एमपीडीए’ अंतर्गत एका गुंडावर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 12:45 AM2017-09-11T00:45:32+5:302017-09-11T00:45:32+5:30
आष्टी तालुक्यातील कडा येथील अशोक जाधव या गुंडावर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : बीड, अहमदनगर, पुण्यात खून, खुनाचा प्रयत्न, जिवे मारण्याच्या धमक्या देऊन जिवे मारण्याच्या धमक्या देणाºया आष्टी तालुक्यातील कडा येथील अशोक जाधव या गुंडावर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. रविवारी त्याला स्थानबद्ध करून हर्सूल कारागृहात त्याची रवानगी करण्यात आली.
मागील चार महिन्यांपासून पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी एमपीडीए अंतर्गत कारवायांचा धडाका लावला आहे. यापूर्वीही दारू विक्रेते, गुंड यांच्यावर एमपीडीएची कारवाई झाली आहे. शनिवारी अंबाजोगाईच्या दारू विक्रेत्यावर कारवाई केल्यानंतर रविवारी पुन्हा आष्टीच्या अशोक जाधवच्या विरोधात एमपीडीए अंतर्गत कारवाईचा बडगा उगारण्यात आला. आष्टीचे पोलीस निरीक्षक यांनी २५ आॅगस्ट रोजी अशोकच्या स्थानबद्धतेचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांमार्फत जिल्हा दंडाधिकारी एम.डी. सिंह यांच्याकडे पाठविला होता. ४ सप्टेंबर रोजी त्याला मंजुरी मिळाली. त्यानंतर आष्टी पोलिसांनी अशोकला स्थानबद्ध करून त्याची रवानगी औरंगाबादच्या हर्सूल कारागृहात केली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, हर्षवर्धन गवळी, सपोनि बारवकर आदींनी केली.