परतूर येथे अवैध बांधकामांवर करणार कारवाई
By Admin | Published: October 25, 2015 11:38 PM2015-10-25T23:38:41+5:302015-10-25T23:58:50+5:30
परतूर - शहरातील प्रभाग क्रमांक एक ते पाच या भागात नगरपालिकेची पूर्वपरवानगी न घेताच बांधकाम करण्यात येत आहे़ या बांधकामासाठी लागणारे संपूर्ण साहित्य रस्त्यावर विखुरलेले आहे़
परतूर - शहरातील प्रभाग क्रमांक एक ते पाच या भागात नगरपालिकेची पूर्वपरवानगी न घेताच बांधकाम करण्यात येत आहे़ या बांधकामासाठी लागणारे संपूर्ण साहित्य रस्त्यावर विखुरलेले आहे़ हे अवैध बांधकाम लवकर थांबविण्यात यावे तसेच १ नोव्हेंबरपर्यत बांधकाम परवाना प्रस्ताव सादर करावा अन्यथा या बांधकामधारकांवर कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा मुख्याधिकारी गंगाधर इरलोड यांनी दिला आहे़
नगरपरिषदेंतर्गत असलेल्या एक व पाच प्रभागांतून अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत. येथील बांधकामधारकांनी परिषदेकडे रितसर परवानगीसाठी कोणतसही प्रस्ताव सादर केलेला नाही़ या भागात मोठ्या प्रमाणात बांधकाम साहित्य रस्त्यावर पडून असल्याचे दिसून येत असून नगर पालिकेकडे या बांधकामासंदर्भात अद्यापही नोंद करण्यात आलेली नाही़ सदरचे बांधकाम हे अवैध असून या बांधकामाच्या मालमत्ताधारकांनी १ नोव्हेंबरपर्यत नगरपरिषदेकडे आवश्यक कागदपत्रे सादर करुन परवानगी मिळवून घ्यावी़ या तारखेच्या आत प्रस्ताव दाखल केले नाही तर त्या बांधकामावर कायदेशीररित्या कार्यवाही करण्यात येईल़, असा इशारा इरलोड यांनी दिला आहे.
कायद्यानुसार अवैध बांधकामधारकास तीन वर्षांची शिक्षा आणि पाच हजार रुपये दंडाची तरतूद आहे. दरम्यान, शहरातील बेकायदेशीर बांधकामाच्या तपासणीसाठी सहा कर्मचाऱ्यांचे एक पथक तयार करण्यात आले असून, हे पथक अवैध बांधकामांवर कारवाई करणार आहे़ ज्यांनी बांधकाम सुरु केलेले आहे़ अशा भागातील बांधकामधारकांनी कामावर परिषदेचा बांधकाम परवाना जवळ ठेवावा़ तसेच तपासणी पथकाने भेट दिल्यानंतर संपूर्ण कागदपत्रे दाखवावीत, असे आवाहनही मुख्याधिकारी इरलोड यांनी केले आहे़ (वार्ताहर)