बायपासवरील मोठ्या इमारतींवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 12:03 AM2019-06-20T00:03:49+5:302019-06-20T00:05:19+5:30
बीड बायपासवर सर्व्हिस रोड तयार करण्यासाठी महापालिका आणि पोलिसांनी यापूर्वी व्यापक मोहीम राबविली होती. या भागातील २३ मालमत्ताधारकांनी न्यायालयात धाव घेतली होती. सर्व मालमत्ताधारकांना न्यायालयातून कोणताही दिलासा मिळाला नाही. त्यामुळे बुधवारी सकाळी महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने बायपासवर कारवाईचा बडगा उगारला. दिवसभरात २३ पैकी १४ मालमत्ता पाडण्यात आल्या. पालिकेच्या या कारवाईमुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
औरंगाबाद : बीड बायपासवर सर्व्हिस रोड तयार करण्यासाठी महापालिका आणि पोलिसांनी यापूर्वी व्यापक मोहीम राबविली होती. या भागातील २३ मालमत्ताधारकांनी न्यायालयात धाव घेतली होती. सर्व मालमत्ताधारकांना न्यायालयातून कोणताही दिलासा मिळाला नाही. त्यामुळे बुधवारी सकाळी महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने बायपासवर कारवाईचा बडगा उगारला. दिवसभरात २३ पैकी १४ मालमत्ता पाडण्यात आल्या. पालिकेच्या या कारवाईमुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
बीड बायपास रोडवर महानुभव आश्रम ते बाळापूरपर्यंत सर्व्हिस रोड करण्याचा निर्णय घेण्यात आला. शहर विकास आराखड्यात रस्त्याच्या दोन्ही बाजूने सर्व्हिस रोड दर्शविण्यात आला आहे. सर्व्हिस रोड तयार करण्याचे दायित्व महापालिकेकडे आहे. मात्र, आजपर्यंत महापालिका चालढकल करीत होती. बायपासवर मागील काही महिन्यात दररोज अपघातात निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत होता. त्यामुळे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी सर्व्हिस रोड तयार करण्याचा विडा उचलला. या कामात फक्त महापालिकेचे सहकार्य घेण्यात आले. मोठा पोलीस बंदोबस्त लावून पाच मजलीपासून दोन मजलीपर्यंत १०० इमारती पाडण्यात आल्या होत्या. बायपासवरील २३ मालमत्ताधारकांनी खंडपीठ, सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाकडून त्यांना कोणताही दिलासा मिळाला नाही. मंगळवारी सर्व याचिका निकाली निघाल्यानंतर बुधवारी सकाळीच मनपाने कारवाई सुरू केली.
बुधवारी सकाळी साडेनऊ वाजताच पालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने एमआयटी महाविद्यालय ते महानुभाव आश्रम, पैठण रोड दरम्यान दिवसभरात १४ अतिक्रमणे भुईसपाट केली. उर्वरित अतिक्रमणांवर गुरुवारी कारवाई केली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पदनिर्देशित अधिकारी वामन कांबळे, पी. डी. पाठक, पी. बी. गवळी, एस. एल. कुलकर्णी, सय्यद जमशीद, विनोद पवार, सागर श्रेष्ठ, सातारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आडे व पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.
या मालमत्तांवर कारवाई
बायपास रोडवरील एमआयटी कॉलेज ते महानुभाव आश्रम पैठण रोड दरम्यान कारवाई करताना सय्यद हबीब, इस्माईल पठाण यांची प्रत्येकी तीन दुकाने, मदिना हॉटेलसमोरील छोट्या टपºया व पत्र्याचे शेड, मंजिल प्राईड समोरील संरक्षण भिंत, एनके ट्रेडिंगजवळील संरक्षण भिंती पाडण्यात आल्या.