कर्णकर्कश आवाजामुळे बुलेटस्वारांना पोलीस उपायुक्तांचा दणका, जागेवर बदलायला लावले सायलेन्सर
By सुमित डोळे | Published: December 15, 2023 10:51 PM2023-12-15T22:51:18+5:302023-12-15T22:51:45+5:30
छत्रपती संभाजीनगरात कारवाईसाठी स्वत: उपायुक्त रस्त्यावर
छत्रपती संभाजीनगर : गेल्या तीन दिवसांपासून शहर पोलिसांनी कर्कष आवाजाच्या सायलेन्सर लावलेल्या दुचाकीचालकांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता उपायुक्त नितिन बगाटे स्वत: क्रांतीचौकात कारवाईसाठी रस्त्यावर उतरले. तेव्हा तासाभरात १८ बुलेटस्वारांवर कारवाई करत त्यांनी जागेवर ते बदलायला लावले.
दुचाकींच्या कंपनीचे मूळ सायलेन्सर बदलून कर्कश आवाज करणारे सायलेन्सर बसवण्याची क्रेझ गेल्या काही वर्षांत शहरात आली आहे. शहरात कॅनॉट प्लेस, निराला बाजार, औरंगपुरा, देवगिरी महाविद्यालय परिसर, छत्रपती महाविद्यालय परिसर, जालना रस्ता, मौलाना आझाद महाविद्यालय परिसर, हर्सूल, उस्मानपुरा, चिकलठाणा बाजार, पडेगाव, वाळूज परिसरात राजरोस बुलेट व अन्य स्पोर्ट दुचाकीचालक कर्कष आवाज करत दुचाकी दामटतात. आत्तापर्यंत पोलिसांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने टवाळखोर दुचाकीचालकांचा आत्मविश्वास वाढला होता. त्यात निवडक बुलेटचालक सायलेन्सरमधून फटाके वाजवल्यासारखा आवाज करत सुसाट जातात. यामुळे आसपासच्या नागरिकांना मात्र अक्षरश: डोके, कानात वेदना होतात. याची गंभीर दखल घेत उपायुक्त नितिन बगाटे यांनी अशांवर कारवायांची माेहिमच हाती घेतली.
जागेवर सायलेन्सर बदलायचे
क्रांतीचौकात शुक्रवारी सायंकाळी ७ ते ८ या वेळेत बगाटे यांनी क्रांतीचौकचे निरीक्षक संतोष पाटील, वाहतूक पोलिसां सोबत कारवाईला सुरूवात केली. तासाभरात त्यांनी १८ बुलेटस्वारांचे सायलेन्सर तपासून मॉडिफाय सायलेन्सर जागेवर काढायला लावत दंड ठोठावला. आत्तापर्यंत सिटीचौक पोलिसांनी २३, क्रांतीचौक १८, एमआयडिसी वाळुज १८, वेदांतनगर पोलिसांनी ८ अशा ८८ बुलेट, स्पोर्ऱ्स बाईक चालकांवर कारवाई करत १ लाख ७ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याचे बगाटे यांनी सांगितले. या कारवाईमुळे मोठा दिलासा मिळेल, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य व्यक्त करत आहेत.