कोरोना लस देण्याच्या नियोजनाचा शासनाने मागितला कृती आराखडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 11:49 IST2020-10-11T11:48:56+5:302020-10-11T11:49:19+5:30
सध्या प्रत्येकाचे लक्ष कोरोनाची लस कधी येणार याकडे लागले आहे. ही लस उपलब्ध झाल्यानंतर ऐनवेळी धावपळ उडू नये, यासाठी पूर्व तयारी केली जात आहे. यात लस देण्यासाठी किती कर्मचारी आहेत, किती आरोग्य केंद्रांवरून ती देता येईल, यासंदर्भात शासनाने मनपाला कृती आराखडा मागितला आहे.

कोरोना लस देण्याच्या नियोजनाचा शासनाने मागितला कृती आराखडा
औरंगाबाद : सध्या प्रत्येकाचे लक्ष कोरोनाची लस कधी येणार याकडे लागले आहे. ही लस उपलब्ध झाल्यानंतर ऐनवेळी धावपळ उडू नये, यासाठी पूर्व तयारी केली जात आहे. यात लस देण्यासाठी किती कर्मचारी आहेत, किती आरोग्य केंद्रांवरून ती देता येईल, यासंदर्भात शासनाने मनपाला कृती आराखडा मागितला आहे. तर लस ठेवण्यासाठी शासकीय कोल्ड स्टोअरेजसह खाजगी कोल्ड स्टोअरेज घेण्याचे नियोजन सार्वजनिक आरोग्य विभागाकडून सुरु आहे.
कोरोनाच्या संकटासोबत दोन हात करणाऱ्या जगाला कोरोना लसीची प्रतीक्षा आहे. भारतासह विविध देशांत लसीची चाचणी सुरु आहे. त्यामुळे ही लस लवकरच येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पोलिओसह विविध आजारांसाठी सध्या देण्यात येणाऱ्या लसी या लहान मुलांना देण्यात येतात. परंतु कोरोनाची लस लहान बालकांपासून तर वृद्धांपर्यंत अशा सर्वांना द्यावी लागणार आहे. त्यामुळे ही उपलब्ध झाल्यानंतर कशा पद्धतीने ती दिली जाईल, यासाठी आतापासूनच नियोजन सुरु केले आहे.
यासाठी शासनाने मनपाला कृती आराखडा मागतिला आहे, असे मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले. येणाऱ्या लसीसाठी ही एकप्रकारे पूर्व तयारी असल्याचे त्या म्हणाल्या. प्रत्येकाला लस द्यावी लागणार आहे. त्यामुळे लसींची संख्या जास्त राहणार आहे. त्यासाठी अधिक जागा लागेल. शहरात छावणीत आणि सिडकोतील प्रशिक्षण केंद्रात शासकीय कोल्ड स्टोअरेज आहे. त्याबरोबर खाजगी कोल्ड स्टोअरेज कुठे कुठे उपलब्ध आहेत, याची माहिती घेऊन संपर्क साधला जात आहे, असे आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे म्हणाले.