भ्रष्टाचारप्रकरणी खैरेंवर कारवाई व्हावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 12:49 AM2017-08-01T00:49:19+5:302017-08-01T00:49:19+5:30
शिवसेनेचे खा. चंद्रकांत खैरे यांनी विकासनिधीतून केलेल्या कामात भ्रष्टाचार केल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची कारवाई व्हावी, अशी मागणी शिवसेनेचे कन्नडचे आ. हर्षवर्धन जाधव यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शिवसेनेचे खा. चंद्रकांत खैरे यांनी विकासनिधीतून केलेल्या कामात भ्रष्टाचार केल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची कारवाई व्हावी, अशी मागणी शिवसेनेचे कन्नडचे आ. हर्षवर्धन जाधव यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केली.
उपविभागीय अधिकाºयांनी केलेल्या चौकशीत खासदार खैरे यांनी कन्नड तालुक्यात खासदार निधीतून केलेल्या कामातील गैरव्यवहार समोर आला आहे. यामुळे शासनानेच त्यांच्यावर कारवाई करावी, असे सांगून आ. जाधव म्हणाले की, ज्याप्रमाणे आ. छगन भुजबळ यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन तुरुंगात टाकले आहे, त्याचप्रमाणे खैरेंनादेखील तुरुंगात टाकण्यात यावे. लोकप्रतिनिधींच्या निधीतील कामांमध्ये खा. खैरे यांनी केलेला घोळ ही एक प्रकारची चोरीच आहे. भुजबळांना एक न्याय आणि खैरे सत्तेमध्ये असल्यामुळे त्यांना दुसरा न्याय, हे योग्य वाटत नाही. खैरेंना सत्तेमुळे क्लीन चीट मिळत असेल तर भुजबळांनादेखील तुरुंगातून बाहेर काढावे, अशी मागणी आ. जाधव यांनी केली.
खा. खैरेंवर काय कारवाई करणार, याबाबत आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची एकदा भेट घेऊ. पक्षानेदेखील याप्रकरणी आत्मपरीक्षण केले पाहिजे. खैरेंवर कारवाई करण्याऐवजी पक्षविरोधी कृत्य केल्याबद्दल माझ्याच नावाने बिल फाडण्यात येते की काय अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
सर्व लोकप्रतिनिधींच्या
कामाची चौकशी करा
खा. खैरेंनी यांनी विकासकामात घोळ केल्याचे चौकशी समितीच्या अहवालात उघड झाले आहे. खैरेंप्रमाणे सर्व लोकप्रतिनिधींच्या विकास निधीतून केलेल्या कामांची चौकशी झाली पाहिजे. सुरुवात माझ्या मतदारसंघातून केली तरी चालेल. काम न करता मी पैसे उचलले असतील तर मी राजीनामा देतो. अन्यथा खैरेंनी तरी राजीनामा द्यावा, असे आव्हान आ. जाधव यांनी दिले. खा. खैरेंवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. यासाठी निवडणूक आयोग, अंमलबजावणी संचालनालय आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात येईल., असेही त्यांनी स्पष्ट केले.