लॉकडाऊन काळात हयगय करणाऱ्या ३८ पोलिसांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 05:05 PM2020-07-09T17:05:19+5:302020-07-09T17:09:54+5:30
यापैकी ७ पोलिसांना निलंबित केल्याची माहिती
औरंगाबाद : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्व यंत्रणा रात्रंदिवस काम करीत असताना या कामात हयगय करणाऱ्या ३८ पोलिसांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त मीना मकवाना यांनी दिली. यापैकी ७ पोलिसांना निलंबित केल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोनाबाधित वसाहती सील केलेल्या भागात तब्बल ५०० पोलीस तैनात आहेत. अचानक केलेल्या तपासणीत नेमून दिलेल्या ठिकाणी गैरहजर राहणे अथवा विनाकारण जनतेला त्रास देणाऱ्या ३८ कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.
प्राथमिक चौकशी अहवालानुसार ७ पोलिसांना निलंबित करून त्यांची खातेनिहाय चौकशी केली जात आहे, तर उर्वरित कर्मचाऱ्यांपैकी काहींना ताकीद देऊन सोडले, तर काहींची चौकशी सुरू आहे. ते दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई होईल. बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा त्यांनी या कारवाईतून शहर पोलिसांना दिला.