नवरात्रोत्सवात कर्णपुरातील रस्त्यावर स्टॉल लावणाऱ्यावर कारवाई; छावणी परिषद सीईओंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 02:27 PM2024-09-27T14:27:48+5:302024-09-27T14:30:02+5:30

छावणी परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नवरात्रोत्सव आधी कर्णपुरा यात्रेची पाहणी करून सूचना देण्याची ही पहिलीच वेळ ठरली.

Action taken against those setting up street stalls in Karnpur during Navratri festival; A warning from camp council CEOs | नवरात्रोत्सवात कर्णपुरातील रस्त्यावर स्टॉल लावणाऱ्यावर कारवाई; छावणी परिषद सीईओंचा इशारा

नवरात्रोत्सवात कर्णपुरातील रस्त्यावर स्टॉल लावणाऱ्यावर कारवाई; छावणी परिषद सीईओंचा इशारा

छत्रपती संभाजीनगर : नवरात्रोत्सवात १२ लाखांपेक्षा अधिक भाविक ज्या देवीचे दर्शन घेतात, ती कर्णपुरा देवीची यात्रा छावणी परिषदेच्या जागेवर भरली जाते. या यात्रेत कोणतीही मोठी दुर्घटना घडू नये म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी आकांक्षा तिवारी यांनी गुरुवारी परिसराची पाहणी केली.

रस्त्यावर स्टॉल लागतात यामुळे पायी चालणाऱ्या भाविकांना अडथळा निर्माण होतो. काँक्रीट रस्ता सोडून १० फूट दूर स्टॉल लावण्यात यावे व जो विक्रेता रस्त्यावर दिसेल त्यावर कारवाई करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी कंत्राटदार व कर्मचाऱ्यांना दिल्या.

सव्वातास केली पाहणी
आकांक्षा तिवारी व छावणी परिषदेचे अधिकारी, तसेच टीम ऑफ असोसिएशनचे पदाधिकारी यांनी दुपारी तीन वाजता कर्णपुरा यात्रा मार्गाची पाहणी करण्यास सुरुवात केली व ४:१५ वाजता पाहणी संपली. देवीचे मंदिर व पाठीमागील बालाजी मंदिरापर्यंतच्या परिसराची पाहणी केली व भाविकांची मोठी गर्दी झाल्यावरही कोणालाही त्रास होणार नाही, याची संपूर्ण काळजी घेण्यावर यावेळी चर्चा झाली. त्यानुसार पोलिस आयुक्त, मनपा आयुक्तांशी चर्चा करून जास्तीत जास्त सुविधा कशा निर्माण होईल यावर लक्षकेंद्रित करीत असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आकांक्षा तिवारी यांनी दिली. यावेळी टीम ऑफ असोसिएशनचे हेमंत लांडगे, प्रफुल्ल मालाणी, आदेशपालसिंग छाबडा, लक्ष्मीनारायण राठी अन्य पदाधिकाऱ्यांनीही यावेळी सूचना मांडल्या.

खाद्यपदार्थांची, पाण्याची होणार तपासणी
खाद्यपदार्थातून विषबाधा होऊ नये, तसेच अस्वच्छ पाणी वितरित होऊ नये, यासाठी छावणी परिषद व स्वयंसेवी संस्थांच्यावतीने सर्व हॉटेल, स्टॉलवरील खाद्यपदार्थांची तपासणी करण्यात येणार आहे. पिण्याचे पाण्याचे नमुने घेतले जाणार आहे. तसेच कचरा साठू नये यासाठी डस्टस्बिनचा वापर, फायर सिलिंडर प्रत्येक स्टॉलधारकांकडे असणे आवश्यक आहे. तसेच खाद्यपदार्थ बनविणाऱ्यांकडे अन्न व औषध प्रशासनाचा परवाना आवश्यक असणार आहे.

छावणी परिषदेच्या सीईओंची पहिल्यांदाच यात्रेला भेट
छावणी परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नवरात्रोत्सव आधी कर्णपुरा यात्रेची पाहणी करून सूचना देण्याची ही पहिलीच वेळ ठरली.

आकडेवारी: 
७८ सीसीटीव्हीची यात्रेवर नजर
६० हायमास्टद्वारे प्रकाशझोत
४० एकर जागेवर भरणार यात्रा
५ एकर जागा छावणी परिषद
३५ एकर जागा खासगी मालकीची
१.६ कि.मी.चा यात्रा मार्ग
५० पेक्षा अधिक मोबाईल टॉयलेट
१ ॲम्ब्युअलन्स देवी मंदिराबाहेर उभी राहणार
२ पोलिसांच्या तीन चौक्या असणार
 

Web Title: Action taken against those setting up street stalls in Karnpur during Navratri festival; A warning from camp council CEOs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.