अजिंठ्यामध्ये दोन गटांत हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 12:44 AM2018-05-04T00:44:45+5:302018-05-04T00:45:15+5:30
अजिंठा : अजिंठा येथे प्रार्थनास्थळाजवळ डीजे वाजविल्याच्या कारणावरून दोन गटांत तुफान हाणामारी होऊन दोन जण गंभीर जखमी झाले. दरम्यान, ...
अजिंठा : अजिंठा येथे प्रार्थनास्थळाजवळ डीजे वाजविल्याच्या कारणावरून दोन गटांत तुफान हाणामारी होऊन दोन जण गंभीर जखमी झाले. दरम्यान, जमावाने येथील पोलीस ठाण्यावरही दगडफेक केल्याने पोलिसांच्या केबिनसह वाहनाचे मोठे नुकसान झाले. ही घटना गुरुवारी सायंकाळी सात वाजता बसस्थानकानजीक घडली. अजिंठा येथे तणावपूर्ण शांतता असून जादा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहेत.
या घटनेतील जखमी झालेले शेख मुख्तार शेख गफ्फार (२६) व शेख इम्रान शेख गफ्फार (२३, रा. अजिंठा) यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गुरुवारी सायंकाळी लग्नाची वरात प्रार्थनास्थळाजवळ आली असता या दोघांनी डीजे बंद करा, असे सांगितल्याने दोन्ही गट समोरासमोर आले. वºहाडातील काही तळीरामांनी त्यांना लाठ्याकाठ्या व चाकूने मारहाण केली. ब्लेडने हातावर वार केले. बघता बघता गावात मोठा जमाव जमला. घटनेची तक्रार देण्यासाठी जमाव अजिंठा पोलीस ठाण्यात गेला. तेथे पोलीस तक्रार घेत असताना काही लोकांनी पोलीस ठाण्यावर दगडफेक केली. पोलीस व तक्रार देणारे आपला जीव वाचविण्यासाठी पोलीस ठाण्यात घुसले. यात काही पोलिसांना मार लागला.
पोलिसांकडून लाठीमार
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे बघून पोलिसांनी ठाण्यासमोर लाठीमार करून जमाव पांगविला. त्यानंतर सिल्लोड, अजिंठा, फर्दापूर, सोयगाव, औरंगाबाद येथील पोलिसांचा ताफा गावात तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. सहायक पोलीस निरीक्षक किरण आहेर, फौजदार अर्जुन चौधर, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश बिरादार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.