नऊ खंडणीखोरांविरूद्ध मोक्काअंतर्गत कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2017 12:04 AM2017-06-30T00:04:31+5:302017-06-30T00:08:22+5:30
नांदेड : व्यावसायिकांना खंडणी मागून जनमाणसात दहशत निर्माण करणाऱ्या ९ जणांविरूद्ध मोक्का (महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण) कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : व्यावसायिकांना खंडणी मागून जनमाणसात दहशत निर्माण करणाऱ्या ९ जणांविरूद्ध मोक्का (महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण) कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे़
जिल्ह्यात गत दोन वर्षांपासून सलग दोन खून करून दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीने शहरातील तरुणांना प्रोत्साहित करून गुन्हेगारी कृत्य करण्यासाठी टोळी निर्माण केली़ या टोळीच्या मदतीने शहरातील प्रतिष्ठित व्यावसायिकांना फोनवर धमकावून तसेच घातक शस्त्रांचा धाक दाखवत खंडणीची मागणी केली़ व्यावसायिक खंडणी देत असल्याचे पाहून गुन्हेगारांचे मनोबल वाढले़
परिणामी वारंवार खंडणीची मागणी होत असल्याने काही व्यावसायिकांनी याबाबत पोलिसात तक्रारी दिल्या़ याचा पाठपुरावा पोलिसांनी केला असता खंडणी बहाद्दर टोळीतील सदस्यांविरूद्ध नांदेडसह पंजाब राज्यात सुपारी घेवून खून, खूनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, खंडणी अशा प्रकारचे गुन्हे नोंद असल्याचे समोर आले़
या टोळीचा बिमोड करण्यासाठी पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने टोळीतील सदस्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत़ महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमातंर्गत जगजितसिंघ उर्फ जग्गी दिलबागसिंग संधू (वय २३, रा़अबचलनगर, नांदेड), मनप्रितसिंघ उर्फ सोनू सुरजनसिंघ औलख (वय २९, रा़बडपुरा, नांदेड), ईश्वरसिंघ उर्फ लाली मुख्तारसिंघ रंधावा (वय २१, रा़ बडपुरा), रंजितसिंघ उर्फ सोनी सूच्चासिंग चिम्मा (वय ३८, बडपुरा), रंजितसिंघ उर्फ रज्जू करमसिंघ तबेलेवाले (वय ३३, रा़शहीदपुरा), हरविंदरसिंघ उर्फ रिंदा चरणसिंघ संधू, हरजिंदरसिंघ उर्फ आकाश जगजितसिंघ गाडीवाले, सन्नीसिंघ धिल्लो, करमजितसिंघ उर्फ ऋषी मंजितसिंघ भाटीया (वय २७) या ९ जणांविरूद्ध गुन्हे नोंद करण्यात आले असून तपास पोलीस उपअधीक्षक विशाल खांबे हे करीत आहेत़
सणासुदीच्या काळात सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या गर्दीचा फायदा घेवून गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक सक्रीय होतात़ या पार्श्वभूमीवर हिस्ट्री शिटर गुन्हेगारांची माहिती संकलीत करून या काळात त्यांना स्थानबद्ध केले जाते़ वारंवार कारवाई करूनही गुन्हेगारी प्रवृत्ती कायम राहिल्यास अशा गुन्हेगाराविरूद्ध अभिप्राय मागवून तडीपारीची कारवाई केली जाते़