औरंगाबाद विमानतळावर अभिनेता राजकुमार राव अन् ‘लाईट, कॅमेरा, ॲक्शन’
By संतोष हिरेमठ | Published: January 23, 2023 12:27 PM2023-01-23T12:27:31+5:302023-01-23T12:28:39+5:30
चिकलठाणा विमानतळावर वर्षभरापूर्वी मनोज वाजपेयीची प्रमुख भूमिका असलेल्या ‘डिस्पॅच’चे चित्रीकरण औरंगाबाद विमानतळावर झाले होते.
औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर पुन्हा एकदा ‘ लाईट, कॅमेरा, ॲक्शन...,’ असा आवाज घुमत आहे. अभिनेता राजकुमार राव आणि दाक्षिणात्य अभिनेत्री ज्योतिका यांची भूमिका असलेल्या श्री' या चित्रपटाची शूटिंग विमानतळावर होत आहे.
चित्रीकरणासाठी रविवारी साहित्य दाखल झाले होते. सोमवारी सकाळी ८ वाजेपासून चित्रीकरण सुरू झाले. चित्रपट असो वा दूरचित्रवाणीवरील एखादा कार्यक्रम, त्यामध्ये विमानतळावरील एखादा प्रसंग हमखास असतो. अशा प्रसंगाच्या चित्रीकरणासाठी सोयीच्या विमानतळांचा शोध घेतला जातो. चित्रपटाचे माहेरघर असलेल्या मुंबईपासून औरंगाबाद शहर अवघ्या काही तासांवर आणि अंतरावर आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत निर्मात्यांना औरंगाबादचे विमानतळ खुणावत आहे. चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी त्यादृष्टीने पोषक वातावरण निर्माण केले आहे. चित्रीकरणासाठी आवश्यक असलेली परवानी एकाच छताखाली दिली जाते. त्यामुळे परवानगी मिळविण्यासाठी निर्मात्यांची होणारी अडचण दूर होण्यास मदत होते. विमानतळावरील धावपट्टी आणि विमान उभ्या करण्याच्या परिसरात चित्रीकरण करण्यासाठी डायरेक्टर जनरल सिव्हिल एव्हिएशन (डीजीसीए) यांच्याकडून परवानगी दिली जाते.
यापूर्वी कधी चित्रीकरण?
चिकलठाणा विमानतळावर वर्षभरापूर्वी मनोज वाजपेयीची प्रमुख भूमिका असलेल्या ‘डिस्पॅच’चे चित्रीकरण औरंगाबाद विमानतळावर झाले होते.