परळीत सोनी TV वरच्या CIDतील पोलीस अन् सावधान इंडियाचे कलाकार नेमा; सुरेश धसांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 17:24 IST2025-01-09T17:24:09+5:302025-01-09T17:24:37+5:30
परळीत 'सत्यमेव जयते'च्या ऐवजी 'असत्यमेव जयते' असं नाव टाकलं पाहिजे, असंही सुरेश धस यांनी म्हटलं आहे.

परळीत सोनी TV वरच्या CIDतील पोलीस अन् सावधान इंडियाचे कलाकार नेमा; सुरेश धसांची मागणी
Suresh Dhas Speech: "परळी शहरातील पोलीस धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड याच्या इशाऱ्यावर सर्व काही जमा करायचे काम करतात. यामध्ये थर्मल असो, सिमेंट फॅक्ट्री यांच्याकडून त्यांना हप्ता गेलाच पाहिजे, अशी पद्धत आहे. यांच्या हप्त्याला वैतागून एक सिमेंट कंपनी परळी सोडून निघून गेली," असा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी पैठणमधील आक्रोश मोर्चात केला आहे. तसंच "परळीत पोलिसांकडून सर्व काही धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड याच्या इशाऱ्यावर होत असल्याने आता तिथं पोलीस दलातील अधिकाऱ्यांची नियुक्ती न करताना सोनी चॅनलवरील सीआयडी आणि सावधान इंडियातील कलाकारांची नेमणूक करावी, असं पत्रच मी मुख्यमंत्री महोदयांना देणार आहे," असं उपहासात्मक भाष्यही धस यांनी केलं आहे.
भ्रष्टाचारावरून धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड याच्यावर आरोप करताना सुरेश धस म्हणाले की, "परळीत थर्मलमधील भंगार रोजच्या रोज चोरीला जातं. या चोरीमध्ये पोलिसांचा वाटा असतो आणि त्यानंतर वाल्मीक कराडचा वाटा असतो. एसटी महामंडळातील काही गोष्टींची चोरी केली जाते. या चोरीवरही लक्ष ठेवायला पोलीस असतात आणि या पोलिसांनी कराडला जाऊन भेटायचं, असा प्रघात आहे. परळीतील डॉ. देशमुखांचा पक्ष मला माहीत नाही. पण त्यांच्यावर खोट्या अॅट्रॉसिटी केस दाखल केल्या, ३५४ कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आणि त्यांचं चारित्र्यहनन केलं," असा आरोप धस यांनी केला आहे.
करुणा मुंडेंच्या गाडीत पिस्तुल ठेवणाऱ्या पोलिसाचं नाव केलं जाहीर
"करुणा मुंडेंच्या गाडीत पिस्तुल ठेवण्यात आलं. महिलेच्या वेषात एका पोलिसानेच हे पिस्तुल ठेवलं. त्या पोलिसाचं नाव होतं संजय सानप. या पोलिसाच्या जोडीला आणखी दोघेजण होते. हे पोलीस कर्मचारी नोकरीतून काढले पाहिजे," अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे. तसंच करुणा मुंडे या धनंजय मुंडेंच्या पहिल्या पत्नी आहेत, असंही धस म्हणाले.