औरंगाबादेत कुणी पाळली बंदी; कुणी साधली संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 01:00 AM2018-06-24T01:00:28+5:302018-06-24T01:01:25+5:30
राज्य शासनाच्या प्लास्टिक बंदी आदेशाला पहिल्या दिवशी शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंदी असतानाही अनेक ग्राहकांच्या हातात कॅरिबॅग दिसून येत होत्या; पण काही ग्राहकांनी स्वत:हून कापडी पिशव्या आणल्या होत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : राज्य शासनाच्या प्लास्टिक बंदी आदेशाला पहिल्या दिवशी शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंदी असतानाही अनेक ग्राहकांच्या हातात कॅरिबॅग दिसून येत होत्या; पण काही ग्राहकांनी स्वत:हून कापडी पिशव्या आणल्या होत्या. प्लास्टिक विक्रेत्यांची दुकाने सुरू होती; पण ५० मायक्रॉनपेक्षा अधिक जाडीचे प्लास्टिक विकण्यावर त्यांचा भर होता. काही दुकानदार ठोक विक्रेत्यांकडून खाकी रंगाच्या कागदी पिशव्या घेऊन जाताना दिसले.
जाधववाडीतील फळभाजीपाल्याच्या अडत बाजारात पहाटे अनेक ग्राहकांनी कापडी पिशव्या सोबत आणल्या होत्या. काही ग्राहकांनी वायरच्या पिशव्या खरेदी करून पालेभाज्या नेल्या. शहागंजात हातगाड्यांवरील फळविक्रेते सकाळी कॅरिबॅग देण्यास नकार देत होते. यामुळे अनेक ग्राहक फळे न घेता निघून गेले. काही ग्राहक हातातच केळी, आंबे घेऊन जाताना दिसले. मात्र, दुपारपर्यंतही महानगरपालिकेचे पथक न फिरल्याने काही विक्रेत्यांनी कॅरिबॅगचा वापर सुरू केला. जांभूळ विक्रेत्या महिलांच्या गावी तर बंदी कुठेच नव्हती. फोटोग्राफरला पाहताच त्यांनी कॅरिबॅग पोत्याखाली लपविल्या. आम्ही कॅरिबॅग देत नाही; पण ग्राहकच मागतात, असे राधाबाई जाधव यांनी सांगितले.
मोतीकारंजा परिसरातील प्लास्टिकच्या ठोक विक्रेत्यांची दुकाने दिवसभर सुरूहोती. काही दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी दिसली. तेथे पाहणी केली असता किराणा दुकानदार खाकी रंगाच्या कागदी पिशव्या खरेदी करताना दिसले. कॅरिबॅगवर बंदी आहे; पण ५० मायक्रॉनपेक्षा जास्त जाडीच्या कॅरिबॅगवर तसेच किराणाच्या कॅरी बॅगवर बंदी आहे की नाही, याबाबत दुकानदारांमध्ये संभ्रम कायम होता. काही विक्रेते ओळखीच्या ग्राहकांना गुपचूप कॅरिबॅग विकत होते.
रोशनगेट ते बुढीलेन या रस्त्यावरील डेअरीवर ग्राहकांना प्लास्टिक बॅगमध्ये दूध दिले जात होते. दुधासाठी प्लास्टिक बॅगवर सरकारने बंदी घातली नाही, असे विक्रेत्यांचे म्हणणे होते. शहागंज भाजीमंडईत मोड आलेले कडधान्य कागदी पिशव्यात बांधून देत होते. औरंगपुरा भाजीमंडईत काही ग्राहक सोबत कापडी पिशव्या घेऊन येताना दिसले. येथील भाजी विक्रेते कॅरिबॅग देत नव्हते. प्रत्येक भाजी विक्रेत्यांनी वायरच्या, कापडी पिशव्या विक्रीसाठी ठेवल्या होत्या. १० ते २० रुपयांत या पिशव्या खरेदी करून ग्राहक फळ-भाजीपाला घेऊन जात होते. अशीच परिस्थिती हडको, सिडको एन-७, मुकुंदवाडी, रेल्वेस्टेशन भाजीमंडईतही दिसली.
वायर, कॉटनच्या पिशव्यांना मागणी
गुलमंडी, शहागंज परिसरातील पिशव्या विक्रेत्यांच्या दुकानावर आज तुरळक गर्दी दिसून आली. पिशव्या खरेदी करताना जास्त महिला दिसल्या. काही जणी पालेभाज्यासाठी साड्यांच्या पिशव्या, वायरच्या पिशव्या, काही जणी किराणा सामान आणण्यासाठी कॉटन, ताडपत्रीच्या जाड पिशव्या खरेदी करीत होत्या. वायरच्या पिशव्या १० ते ३५० रुपये, कॉटन १५० ते ५५० रुपये, शॉपिंग बॅग १६० ते ३५० रुपये, ताडपत्रीच्या पिशव्या ५५० ते ६५० रुपयांत विकल्या जात होत्या.
खाकी पाकिटाचे भाव वधारले
कॅरिबॅगला पर्याय म्हणून कागदी पाकिटे बाजारात विक्रीला आले आहेत. शहरातील औद्योगिक वसाहत व मुंबई येथून आलेल्या खाकी रंगाच्या कागदी पाकिटाला मागणी वाढली होती. आवक कमी व मागणी जास्त असल्याने आज किलोमागे १० ते २० रुपयांनी भाववाढ करून ते विकल्या जात होते. ५० ते ११० रुपये किलोदरम्यान या खाकी कागदाचे पाकिटे विकल्या जात होते.