आदर्श बँक घाेटाळा, मानकापे कुटुंबातील तिघे पाचव्यांदा कारागृहातून पाेलिसांच्या ताब्यात

By सुमित डोळे | Published: March 2, 2024 01:22 PM2024-03-02T13:22:45+5:302024-03-02T13:23:08+5:30

आदर्श महिला नागरी सहकारी बँकेचे २०१७-२२ चे रेकॉर्डही नव्याने तपासणार

Adarsh Bank scam, Mankape family three arrested for the fifth time from jail | आदर्श बँक घाेटाळा, मानकापे कुटुंबातील तिघे पाचव्यांदा कारागृहातून पाेलिसांच्या ताब्यात

आदर्श बँक घाेटाळा, मानकापे कुटुंबातील तिघे पाचव्यांदा कारागृहातून पाेलिसांच्या ताब्यात

छत्रपती संभाजीनगर : कोट्यवधींचा घोटाळा करणाऱ्या अंबादास मानकापे, त्याचा मुलगा सुनील व सून सुनंदा, संचालक नामदेव कचकुरेला पोलिसांनी पाचव्यांदा हर्सूल कारागृहातून ताब्यात घेत अटक केली. आदर्श महिला नागरी सहकारी बँकेत २०२२-२३ या एका वर्षात ४८ कोटी ८५ लाख ७२ हजार रुपये हडपल्याप्रकरणी डिसेंबर महिन्यात तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांनी तिघांना गुरुवारी ताब्यात घेतले. न्यायालयाने तिघांना ३ मार्चपर्यंत पाेलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

आरबीआयच्या निर्देशानंतर बँकेच्या लेखापरीक्षणानंतर डिसेंबर, २०२३ मध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च, २०२३ दरम्यानचे बँकेच्या मुख्य शाखेचे लेखापरीक्षण केले. त्यात मानकापेने सहकारी बँकेतून पहिल्या टप्प्यात ओम कन्स्ट्रक्शन, आदर्श बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स, आदर्श ऑइल मिल, समर्थ इंटरप्रायजेस, आदर्श डेअरी प्रॉडक्टसच्या नावे लाखोंचे विनातारण कर्ज उचलले. त्यासाठी ना कागदपत्रांची पूर्तता केली ना पुढे कर्जाची परतफेड केली. शिवाय, जवळच्यांनाच कोट्यवधींच्या कर्जाची खैरात वाटली. २०२० मध्येच मानकापेला कारवाईची कुणकुण लागली होती. त्यामुळे त्याने सून व अन्य नातेवाइकांना संचालक मंडळावरून वगळून ओळखीतील महिलांना संचालक बनविले. मात्र, मानकापे, त्याची मुले, सहव्यवस्थापक नामदेव कचकुरेंनीच घोटाळा केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. निरीक्षक संभाजी पवार, उपनिरीक्षक अशोक अवचार या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

- ११ जुलै रोजी आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या २०२ कोटींच्या घोटाळ्यात अंबादास, मुलगा सुनील, सून सुनंदा व वनितासह १३ आरोपींना सर्वप्रथम अटक झाली. यातील १२ आरोपी अद्यापही कारागृहात आहे.
- त्यानंतर त्याच्यावर मात्र, याच दरम्यान मानकापेच्या आदर्श महिला नागरी सहकारी बँकेतही घोटाळा झाल्याचे निष्पन्न झाले.
- मानकापेकडे व्यवस्थापक असलेल्या देवीदास सखाराम आधाने (रा. नवजीवन कॉलनी) याच्या यशस्विनी संस्थेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
- मानकापे, त्याच्या सुना व मुले एकूण चार घोटाळ्यांच्या पाच गुन्ह्यांमध्ये मुख्य आरोपी आहे. त्यांपैकी त्याला पाचव्यांदा ताब्यात घेण्यात आले.

‘त्या’ पाच वर्षांचेही ऑडिट
निरीक्षक संभाजी पवार यांच्या माहितीनुसार, गुन्हा हा एप्रिल २०२२ ते मार्च, २०२३ दरम्यानच्या घोटाळ्यांचा आहे. मात्र, त्यापूर्वी मानकापे गैरव्यवहार केल्याचा संशय आहे. त्यामुळे आदर्श महिला नागरी सहकारी बँकेच्या २०१७-२०२२ दरम्यानच्या स्वतंत्र ऑडिटसाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्यात घोटाळ्याची रक्कम वाढण्याची दाट शक्यता असल्याचे पवार यांनी सांगितले.

Web Title: Adarsh Bank scam, Mankape family three arrested for the fifth time from jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.