आदर्श शाळांमध्ये औरंगाबादच्या १७ शाळांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:05 AM2021-03-08T04:05:02+5:302021-03-08T04:05:02+5:30
किशोर कुलकर्णी लोकमत न्यूज नेटवर्क लासुरगाव : खासगी शाळांच्या तुलनेत कमी सोयीसुविधा असूनही विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी अहोरात्र झटणाऱ्या शाळांना राज्य ...
किशोर कुलकर्णी
लोकमत न्यूज नेटवर्क
लासुरगाव : खासगी शाळांच्या तुलनेत कमी सोयीसुविधा असूनही विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी अहोरात्र झटणाऱ्या शाळांना राज्य शासनाकडून आदर्श पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. अशा गुणवत्तापूर्ण काम करणाऱ्या राज्यातील ४८८ शाळांची यादी राज्य शासनाने नुकतीच जाहीर केली आहे. त्यात औरंगाबाद जिल्ह्यातील १७ शाळांचा समावेश आहे.
राज्य शासनाकडून शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या शाळांचा सन्मान केला जातो. राज्यातील सर्व शाळांमधून ४८८ शाळांना ‘आदर्श शाळा’ म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय मंडळाच्या ८१ शाळा आहेत. आदर्श शाळांच्या यादीत औरंगाबाद जिल्ह्यातील १७ शाळांचा समावेश आहे. यामध्ये औरंगाबाद महानगरपालिका - २, औरंगाबाद तालुका - २, गंगापूर - १, कन्नड - १, खुलताबाद - १, पैठण - २, फुलंब्री - १, सिल्लोड - १, सोयगाव - २, वैजापूर तालुक्यातील ४ शाळा असून, लासुरगाव, बोरगाव, पोखरी, सुदामवाडी येथील जिल्हा परिषदेच्या चार शाळांचा या यादीत समावेश आहे. या शाळांनी विविध निकषांची पूर्तता केली असून, प्रत्येक शाळेची पटसंख्या शंभर ते दीडशे विद्यार्थ्यांच्या पुढे आहे. बालवर्ग व अंगणवाडी संलग्न असलेल्या या शाळा असून, खासगी शाळांमध्ये मिळणाऱ्या सर्व सुविधा या शाळांमध्ये उपलब्ध आहेत. दर्जात्मक व गुणात्मक बाबींवर विशेष लक्ष देण्यात आले आहे.