पालकांची चिंता वाढवणारी बाब, मोठ्यांपेक्षा चिमुकल्यांमध्ये भाजण्याचे प्रमाण अधिक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 11:41 AM2022-09-16T11:41:47+5:302022-09-16T11:42:05+5:30
घरातील कामात व्यस्त होताना मुलांकडे दुर्लक्ष करणे पडले अनेकांना महागात पडले आहे
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : साधा चटका लागला तर ‘आई गं...’ असा शब्द प्रत्येकाच्या तोंडातून बाहेर पडतो. मग चटक्यापेक्षा भाजणाऱ्यांच्या स्थितीचा विचारही केलेला नको. चिंताजनक बाब म्हणजे गेल्या दोन वर्षांत मोठ्या व्यक्तीच्या तुलनेत १२ वर्षांखालील लहान मुलांचे भाजण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे घरातील कामांमध्ये व्यस्त राहणाऱ्या कुटुंबीयांनी लहान मुलांकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.
घाटी रुग्णालयात विविध कारणांनी भाजल्या जाणाऱ्या रुग्णांवर स्वतंत्र वाॅर्डात उपचार केले जातात. गेल्या २० महिन्यांत याठिकाणी दाखल झालेल्या १२ वर्षांखालील मुलांची संख्या अधिक आहे. या वयोगटातील तब्बल १३८ मुलांवर उपचार करण्यात आले. इतर वयोगटांच्या तुलनेत ही संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे ही वेळ येण्याआधीच पालकांनी सजग राहण्याची गरज आहे. घाटीतील सर्जरी विभागप्रमुख डाॅ. सरोजिनी जाधव, डाॅ. सुरेश हरबडे, डाॅ. मोहम्मद अन्सारी, डाॅ. जुनेद शेख, डाॅ. फय्याज अली, डाॅ. अनिता कंडी, डाॅ. प्रवीणकुमार वासडीकर हे रुग्णांच्या उपचारासाठी प्रयत्नशील असतात.
का भाजतात चिमुकले
अंगावर गरम पाणी, अंगावर गरम भाजी पडल्याने, खेळता खेळता चुलीवर, गॅसवर पडल्याने, फटाके उडविताना यासह काही अपघाताच्या घटनांमुळेही बालके भाजण्याच्या घटना घडतात. काडीपेटीशी खेळताना अचानक आग लागूनही मुले भाजण्याच्या घटना होतात. त्यामुळे लहान मुलांना अशा वस्तूंपासून दूर ठेवले पाहिजे, असे तज्ज्ञांनी म्हटले.
मोठ्या व्यक्ती भाजण्याची कारणे
क्षणिक रागात अनेक व्यक्ती जाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात. त्याबरोबर आग लागण्याच्या घटनांमध्येही व्यक्ती भाजण्याच्या घटना होतात.
इलेक्ट्रिक बर्न
गेल्या काही वर्षांत विद्युत तारांना स्पर्श होणे यासह विद्युत उपकरणांतील बिघाडामुळे भाजण्याच्या घटनाही होत आहेत. गेल्या २० महिन्यांत इलेक्ट्रिक बर्नमुळे भाजलेल्या ४९ व्यक्तीवर घाटीत उपचार करण्यात आले.
घाटीतील उपचार झालेल्या भाजलेल्या रुग्णांची स्थिती
(जानेवारी २०२१ ते ऑगस्ट २०२२)
१२ वर्षांखालील- ७०-६८
- १३ ते २०-२०-७
-२१ ते ३० - ५३-३१
-३१ ते ४०-४२-२३
-४१ ते ५०-१६-९
-५१ ते ६०-१२-११
-६० वर्षांवरील-७-१९