१ जूनपासून जायकवाडीत पाच टीएमसीची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:04 AM2021-07-27T04:04:36+5:302021-07-27T04:04:36+5:30

पैठण : जायकवाडी धरणाच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे १ जूनपासून जवळपास पाच टीएमसी पाण्याची धरणात भर पडली ...

Addition of five TMCs in Jayakwadi from June 1 | १ जूनपासून जायकवाडीत पाच टीएमसीची भर

१ जूनपासून जायकवाडीत पाच टीएमसीची भर

googlenewsNext

पैठण : जायकवाडी धरणाच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे १ जूनपासून जवळपास पाच टीएमसी पाण्याची धरणात भर पडली आहे. १४०५ क्यूसेक क्षमतेने धरणात आवक सुरू असून, सोमवारी धरणात ३६ टक्के जलसाठा होता. गतवर्षी नाशिक, अहमदनगरचे पाणी दाखल होण्यापूर्वी स्थानिक पावसावर ७० टक्के धरण भरले होते.

नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील पाण्यावरच जायकवाडीची भिस्त असल्याचे चित्र गेल्या काही वर्षांत समोर आले; परंतु, गतवर्षी नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील पाण्याचा एक थेंब आलेला नसताना जायकवाडीच्या जलसाठ्यात केवळ स्थानिक पाणलोट क्षेत्रातील पावसाने मोठी भर पडली होती. यंदाही स्थानिक पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण चांगले असल्याने जायकवाडी धरणाच्या जलाशयात १३६.६८ दलघमी (४.८२ टीएमसी)ची भर पडली आहे.

जायकवाडी धरणाचे स्थानिक व मुक्त पाणलोट असलेल्या औरंगाबाद, गंगापूर, नेवासा, पैठण, शेवगाव, वैजापूर, श्रीरामपूर, येवला, शिर्डी आदी भागात पावसाने सातत्य राखल्याने १ जूनपासून जलसाठ्यात भर पडण्यास प्रारंभ झाला आहे. रविवारी रात्री स्थानिक पाणलोट क्षेत्रातून २.२ दलघमी पाण्याची आवक झाल्याचे धरण अभियंता संदीप राठोड यांनी सांगितले. सोमवारी धरणात १५१९.७९८ दलघमी (५३.६५ टीएमसी) जलसाठा झाला होता. यापैकी उपयुक्त जलसाठा ७८१.६९२ दलघमी (२७.६० टीएमसी) इतका आहे. धरणात ३३ टक्के जलसाठा असल्यास शेती सिंचन व पिण्यासाठी पाणीपुरवठा नियोजनाप्रमाणे करता येतो. यामुळे यंदा लाभक्षेत्रातील शेतकरी व औरंगाबाद शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे.

यंदा धरण १०० टक्के भरण्याची अपेक्षा

जायकवाडी धरणात अद्याप नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील पाण्याची आवक झालेली नाही. स्थानिक पाणलोट क्षेत्रातील पावसाने जलसाठ्यात झालेली वाढ अत्यंत दिलासा देणारी आहे. नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरण समूहातून आवक आल्यास जायकवाडी धरण यंदाही १०० टक्के भरेल, अशी अपेक्षा धरण अभियंता काकडे यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Addition of five TMCs in Jayakwadi from June 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.