यापुढे शिक्षकांच्या गोपनीय अहवालात विद्यार्थी वाचन क्षमतेचाही समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2017 03:45 PM2017-12-11T15:45:41+5:302017-12-11T15:55:22+5:30
यापुढे शिक्षकांच्या गोपनीय अहवालात विद्यार्थी वाचन क्षमतेचा समावेश असणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांच्या वाचन क्षमतेला १०० गुणांपैकी मिळालेल्या गुणांची श्रेणीनिहाय नोंद होणार आहे.
औरंगाबाद : विभागीय आयुक्तांच्या जटवाडा शाळा भेटीमुळे जिल्हा परिषद शाळेच्या गुणवत्तेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. सध्या आयुक्तांच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील संपूर्ण जि. प. शाळांच्या तपासणीची मोहीम सुरू आहे. शाळा तपासणी दरम्यान अनेक जि. प. शाळांतील मुलांना धड लिहिता येत नाही आणि वाचताही येत नसल्याचे पथकातील अधिका-यांच्या निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर विद्या प्राधिकरणाने शंभर टक्के शिक्षकांसाठी टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण देऊन शंभर टक्के विद्यार्थ्यांना हमखास वाचायला येईल, असे नियोजन केले आहे.
तथापि, यापुढे शिक्षकांच्या गोपनीय अहवालात विद्यार्थी वाचन क्षमतेचा समावेश असून यासाठी विद्यार्थ्यांच्या वाचन क्षमतेला १०० गुणांपैकी मिळालेल्या गुणांची श्रेणीनिहाय नोंद होणार आहे. कमी गुण मिळणा-या शिक्षकांचे वेतन कमी करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचन क्षमता निर्माण करण्यासाठी शिक्षकांसमोर अध्ययन- अध्यापनाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. यासाठी विद्या प्राधिकरणाने प्रशिक्षणावर भर दिला आहे. शिक्षकांनी मुलांना समजेल असे शिकवावे, मुलांच्या भाषा शिक्षकांना समजली पाहिजे, यासाठी शिक्षकांनी मुलांकडूनच निदान दैनंदिन व्यवहारातील वापरापुरती त्यांची भाषा शिकणे गरजेचे आहे. त्यामुळे मुलांमध्ये असलेली आपल्या भाषेबद्दलचा न्यूनगंड कमी होण्यास मदत होईल. शिक्षक आपल्याकडून शिकतात, याचे कौतुक मुलांना वाटेल व त्यांचा आत्मविश्वास वाढेल. परिणामी, मुलांमध्ये शिकण्याची गोडी निर्माण होईल, अशी भावना विद्या प्राधिकरणाचे प्राचार्य डॉ. सुभाष कांबळे यांनी व्यक्त केली.
विद्या प्राधिकरणाच्या सभागृहात जिल्ह्यातील १२८ केंद्रप्रमुखांसाठी ‘मूलभूत वाचन क्षमता विकास’ या विषयावर प्रशिक्षण आयोजित केले होते. यापुढे १२ डिसेंबर ते १० जानेवारीदरम्यान जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या शंभर टक्के शिक्षकांना टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांना लिहायला- वाचायला येईल, यासाठी शिक्षकांना वाचन विकास टप्पे, बहुभाषिक, भिन्न भाषिक, मुलांसाठी अध्यापनाचे तंत्र, जेवढी पटसंख्या तेवढे कृती आराखडे, गाणी, गोष्टी, संवाद, चित्रवाचन आदी बाबींचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
पायाभूत चाचण्यांचा निकाल
पायाभूत चाचण्यांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ४० टक्के विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाल्याचे निष्पन्न झाले आहे. यासंदर्भात विद्या प्राधिकरणाचे डॉ. सुभाष कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, पोर्टलवर पायाभूत चाचण्यांचा निकाल आतापर्यंत ५० ते ५२ टक्के एवढाच अपलोड झालेला आहे. पायाभूत चाचण्यांचा निकाल शंभर टक्के अपलोड झाल्याशिवाय संकलित मूल्यमापन चाचणीचा निकाल पोर्टलवर भरता येत नाही. शंभर टक्के निकाल अपलोड झाल्यावर जिल्ह्यातील कोणत्या शाळेचा किती निकाल लागला आहे, किती विद्यार्थी मागे आहेत, हे कळेल.