छत्रपती संभाजीनगराला अतिरिक्त २६ एमएलडी पाणी १७ सप्टेंबरनंतर, १५ ऑगस्टचा मुहूर्त हुकला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 08:14 PM2024-07-31T20:14:03+5:302024-07-31T20:14:15+5:30
नवीन पाणीपुरवठा योजनेतच जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत २०० कोटी रुपये खर्चून ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर : शहरातील अनेक वसाहतींना आठव्या, दहाव्या दिवशी पाणीपुरवठा होतोय. पाणीपुरवठ्यातील गॅप कमी करण्यासाठी जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत ९०० मिमी व्यासाची नवीन जलवाहिनीसुद्धा टाकली. या जलवाहिनीने दररोज ७५ एमएलडी पाणी येणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात १८ एमएलडी पाणी येत आहे. फारोळ्यात २६ एमएलडी क्षमतेचे नवीन जलशुद्धीकरण केंद्र तयार झाल्यावर वाढीव पाणी मिळेल. हे काम १५ ऑगस्टपर्यंत होईल, अशी घोषणा केली होती. आता १७ सप्टेंबरनंतर अतिरिक्त पाणी मिळेल, अशी घोषणा मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी केली.
नवीन पाणीपुरवठा योजनेतच जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत २०० कोटी रुपये खर्चून ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली. फारोळ्यातील मनपाच्या जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता कमी असल्याने याच ठिकाणी आणखी एक २६ एमएलडी क्षमतेचे नवीन केंद्र उभारणे सुरू असून, हे काम संथ गतीने सुरू आहे. १५ ऑगस्टपूर्वी हे काम पूर्ण होईल, असे आश्वासन दोन महिन्यांपूर्वी देण्यात आले होते. आता १७ सप्टेंबर सांगण्यात आले. फिल्टरबेड उभारण्यात आलेले नाही. पंपहाऊसचे काम झालेले नाही.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत नवीन ९०० मिमीच्या पाणी योजनेचे काम करण्यात आले. परंतु जलशुद्धीकरण केंद्राच्या कामाला गती नाही. जलशुद्धीकरण केंद्राचे काम पुढील काही दिवसांत पूर्ण होईल, अशी अपेक्षा प्रशासक यांनी व्यक्त केली.