कोरोनात रुग्णांकडून उकळले अतिरिक्त शुल्क; १३ दवाखान्यांनी केले परत, एकाचा परवाना रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 01:10 PM2022-05-28T13:10:26+5:302022-05-28T13:11:30+5:30
रोकडीया हनुमान कॉलनी येथील कृष्णा हॉस्पिटल ॲण्ड आयसीयू यांनी एकाही रुग्णाची रक्कम परत केली नाही.
औरंगाबाद : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत उपचार करण्यासाठी महापालिकेने खासगी रुग्णालयांना विशेष परवानगी दिली होती. शहरातील १४ रुग्णालयांनी रुग्णांच्या नातेवाइकांकडून गरजेपेक्षा जास्त बिल वसूल केले होते. १३ रुग्णालयांनी अतिरिक्त रक्कम वसूलही केली. रोकडा हनुमान कॉलनीतील कृष्णा हॉस्पिटलने एक रुपयाही परत केला नाही. त्यामुळे शुक्रवारी महापालिकेने या रुग्णालयाचा नर्सिंग परवाना निलंबित केला.
कोरोना संसर्गात महापालिकेकडे रुग्णांवर उपचार करण्यासाठी बेडच नव्हते. त्यामुळे शासन आदेशानुसार तातडीने शहरातील खासगी रुग्णालयांना कोविड रुग्णांवर उपचार करण्याची विशेष परवानगी देण्यात आली होती. ज्या रुग्णालयांनी कोविड उपचारासाठी परवानगी घेतली त्या रुग्णालयांनी रुग्णांच्या नातेवाइकांकडून किती रक्कम घेतली याची शहानिशा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आली होती. ९ खासगी रुग्णालयांनी अतिरिक्त शुल्क आकारले होते.
संबंधित रुग्णालयांनी ती रक्कम परत केली नाही, असेही आढळून आले होते. संबंधित रुग्णालयांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने मनपाला दिले हाेते. सेठ नंदलाल हॉस्पिटल, डॉ. हेडगेवार हॉस्पिटल यांनी उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल केले आहे. सनशाईन हॉस्पिटल, एशियन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हायटेक आधार हॉस्पिटल, ग्लोबल इंटरनॅशनल हॉस्पिटल व अजिंठा हॉस्पिटल यांनी रुग्णांच्या नातेवाइकांकडून घेतलेले अतिरिक्त २१ लाख ७५ हजार रुपये परत केले; परंतु रोकडीया हनुमान कॉलनी येथील कृष्णा हॉस्पिटल ॲण्ड आयसीयू यांनी एकाही रुग्णाची रक्कम परत केली नाही. त्यामुळे शुक्रवारी हॉस्पिटलचे नर्सिंग होम प्रमाणपत्र निलंबित करण्यात आल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी कळविले.
मनपाकडून समिती गठित
शहरातील २७ रुग्णांची यादी मनपा आरोग्य विभागास तपासणीसाठी प्राप्त झाली होती. बिलांची पडताळणी करण्यासाठी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांच्या मार्गदर्शनाखाली एक समिती गठित करण्यात आली होती. तपासणीनंतर १३ रुग्णालयांना पैसे परत करावेत, अशी नोटीस बजावण्यात आली होती.