छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तलाठी बदल्यांचे प्रकरण अपर जिल्हाधिकारी तपासणार
By विकास राऊत | Published: August 28, 2024 11:25 AM2024-08-28T11:25:41+5:302024-08-28T11:26:29+5:30
जिल्हाधिकाऱ्यांनी संघटनेशी चर्चा केल्यानंतर दिले आदेश
छत्रपती संभाजीनगर : जिल्हा प्रशासनातील तलाठ्यांच्या बदली प्रकरणावरून नाराजी वाढल्यानंतर मंगळवारी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी राज्य तलाठी महासंघाचे अध्यक्ष अनिल सूर्यवंशी व सदस्यांशी चर्चा केली. बदल्यांमध्ये नेमका काय घोळ झाला आहे, याची वस्तुस्थिती संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडल्यानंतर अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांच्याकडून बदल्यांचे पूर्ण प्रकरण तपासण्याबाबत बैठकीत निर्णय झाला.
‘लोकमत’ने २७ ऑगस्टच्या अंकात ‘पैसे कमवायचे असतील तर पैसे द्यावेच लागतील’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केल्यानंतर प्रशासनासह तलाठ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने याप्रकरणी बैठक लावून सर्व वस्तुस्थिती समजून घेतली.
जिल्हा प्रशासनाने गेल्या आठवड्यात केलेल्या बदल्यांमुळे अनेकांमध्ये नाराजी आहे. बदल्यांमध्ये अन्याय झाल्यामुळे अनेकांनी तलाठ्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर खदखद व्यक्त केली. भविष्यात बदल्यांचा लिलाव आणि घोडेबाजार होण्याचा संशय अनेकांनी सोशल मीडियातील मेसेजमधून व्यक्त केला. ज्यांची बदली मर्जीनुसार झाली, त्यांच्यात तर ‘पैसे कमवायचे असतील तर पैसे द्यावेच लागतील’, अशी चर्चा सुरू असल्याचे समोर आल्याने या प्रकरणाला वाचा फुटली. दरम्यान, ‘लोकमत’मध्ये प्रकाशित वृत्तानंतर तलाठ्यांसह प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे. हे प्रकरण महसूल मंत्र्यांपर्यंत गेले आहे. बदल्यांमध्ये झालेल्या चुकांच्या अनुषंगाने संघटना मुद्देसूद माहितीचा अहवाल तयार करणार आहे.
काय चुका झाल्या ते तपासा...
‘लोकमत’मधील वृत्त वाचल्यानंतर तलाठी संघटनेची बैठक घेतली. बदल्यांच्या प्रकरणात मी काही लक्ष दिले नाही. समुपदेशन समिती माझ्या अध्यक्षतेखाली होती. त्यानुसार सर्व काही नियमानुसार झाले आहे काय, असे विचारल्यानंतर संबंधितांनी होय म्हणून उत्तर दिले. त्यामुळे बदल्यांची याद्यावर स्वाक्षरी केली. बदल्या मनासारख्या होत नसतात. परंतु पारदर्शक प्रक्रिया व्हावी, अशी अपेक्षा आहे. संघटनेचे ऐकून घेतल्यानंतर अपर जिल्हाधिकाऱ्यांना बदली प्रकरणात काय चुका झाल्या आहेत, ते तपासण्याचे आदेश दिले आहेत.
-दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी