क्रीडा संकुलासाठी ३.४१ कोटींचा वाढीव निधी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:03 AM2021-06-20T04:03:26+5:302021-06-20T04:03:26+5:30
फुलंब्री : तालुक्यात होत असलेल्या क्रीडा संकुलाच्या कामासाठी शासनाकडून वाढीव ३ कोटी ४१ लाखांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे ...
फुलंब्री : तालुक्यात होत असलेल्या क्रीडा संकुलाच्या कामासाठी शासनाकडून वाढीव ३ कोटी ४१ लाखांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, निधी उपलब्ध होताच क्रीडा संकुलाच्या कामाला सुरुवात होणार आहे.
फुलंब्री येथील जुन्या जिनिंग प्रेसिंगच्या जागेवर तालुका क्रीडा संकुल उभारण्यासाठी दोन वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली. सुरुवातीला केवळ एक कोटी रुपये मंजूर झाल्याने अंदाजपत्रकातील कामे पूर्ण होणे अशक्य होते. सुरुवातीच्या काळात बोअरवेल, वॉल कंपाउंड, जमीन सपाटीकरण, तसेच प्रशासकीय इमारतीच्या काही भागांचे काम पूर्ण झाले. दरम्यान, कोविडमुळे दीड ते दोन वर्षांपासून कामे थांबली, तर क्रीडा विभागाच्या वतीने सुधारित प्रस्ताव पाठविण्यात आला. त्यानुसार नवीन वाढीव निधीला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे ४.४१ कोटी रुपये निधी मिळणार असून, भव्य क्रीडा संकुल उभारले जाणार आहे.
--
क्रीडाप्रेमींना या सुविधा मिळणार
क्रीडा संकुलामध्ये प्रामुख्याने दोन मजली इमारत केली जाणार आहे. यात पहिल्या मजल्यावर मुला-मुलींची राहण्याची व्यवस्था (वसतिगृह), तर दुसऱ्या मजल्यावर दोन बॅडमिंटन कोर्ट, एक जीम हॉल, एक भांडार गृह असेल. याशिवाय मैदानावर हॉलीबॉल, खो-खो, बास्केटबॉल, कबड्डी या खेळांकरिता स्वतंत्र मैदान तयार केले जाणार आहे.
--
वैभवात पडणार भर
फुलंब्री शहराच्या ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या क्रीडा संकुलामुळे तालुक्यातील विविध खेळांतील प्रावीण्यप्राप्त खेळाडूंना हक्काचे मैदान उपलब्ध होणार आहे. या खेळाडूंना सराव करण्यास मैदान उपयुक्त ठरेल. त्यांच्या कलागुणांना वाव मिळणार आहे. तालुक्याच्या वैभवात हे क्रीडासंकुल एक भर घालणारी वास्तू ठरणार आहे.
--
कोट
गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे काम होऊ शकले नाही, तसेच याला लागणारा निधीही मिळाला नव्हता. आता निधी येण्याचा मार्ग मोकळा झाला असून, या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. - शरद कचरे, तालुका क्रीडा अधिकारी.
-