औरंगाबादेत बाटलीभर पाण्यासाठी विद्यार्थ्यांची वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 11:56 PM2018-05-03T23:56:46+5:302018-05-03T23:57:43+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पिण्याच्या पाण्याची अभूतपूर्व अशी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ऐन परीक्षेच्या काळातच विद्यार्थी, कर्मचा-यांना बाटलीभर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.

Address of the students in Aurangabad bottle water | औरंगाबादेत बाटलीभर पाण्यासाठी विद्यार्थ्यांची वणवण

औरंगाबादेत बाटलीभर पाण्यासाठी विद्यार्थ्यांची वणवण

googlenewsNext
ठळक मुद्देविद्यापीठ : नियोजनाच्या अभावामुळे पाणीटंचाई; कर्मचाऱ्यांच्या ‘चलता है’ संस्कृतीचा फटका, प्रकुलगुरूंनी दिला कारवाईचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पिण्याच्या पाण्याची अभूतपूर्व अशी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ऐन परीक्षेच्या काळातच विद्यार्थी, कर्मचा-यांना बाटलीभर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. प्रकुलगुरूंनी परीक्षांमुळे १५ मे पर्यंत विद्यार्थ्यांना लागेल तेवढे पाणी टँकरने उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. मात्र, कर्मचारी, अधिका-यांच्या ‘चलता है’ संस्कृतीचा विद्यार्थ्यांना फटका बसत आहे.
विद्यापीठातील वसतिगृहे, विभाग, अभ्यासिका आणि प्रशासकीय इमारतींमध्ये पिण्याचे पाणीच उपलब्ध नाही. गुरुवारी दिवसभर अभ्यासिका, विभागातील विद्यार्थी, कर्मचारी हातात पाण्याच्या बॉटल घेऊन विविध विभागांमध्ये पाणी मिळते का? याचा शोध घेत होते.


सामाजिकशास्त्रे इमारतीमधील एका विभागात पाणी उपलब्ध होताच त्याठिकाणी बॉटल भरण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होत होती, तर ग्रंथालय, अभ्यासिका, प्रशासकीय इमारतीमधील एकाही ठिकाणी पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याचे पाहायला मिळाले, तर वसतिगृहांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज वसतिगृहात पिण्याचे मुबलक पाणी उपलब्ध होते. शहीद भगतसिंग वसतिगृहात तर मागील अनेक महिन्यांपासून पिण्याचे पाणी नाही.
व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या वसतिगृहात पिण्याचे पाणी उपलब्ध होते. मात्र, तापवलेल्या पाण्यापेक्षा अधिक गरम पाणी नळाद्वारे येत होते. यामुळे त्याठिकाणी पाणी असूनही पिण्यासाठी उपयोग करता येत नव्हता. विभागांमध्ये सामाजिकशास्त्रे इमारतीमधील अर्थशास्त्र विभाग वगळता इतर ४१ विभागांत पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याचेही पाहायला मिळाले. अभ्यासिकेत अभ्यास करणाºया विद्यार्थ्यांना ग्रंथालय किंवा प्रशासकीय इमारतीमध्ये बाटलीभर पाणी उपलब्ध होत असे. मात्र, त्याठिकाणीही पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्यामुळे तेथील कर्मचारीही वणवण भटकंती करत होते.
विद्यार्थ्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी अनेकवेळा आंदोलने केली आहेत. विद्यार्थ्यांचे आंदोलन होताच एक, दोन दिवस पाणीपुरवठा व्यवस्थित केला जातो. मात्र, नंतर तिसºया दिवशी पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण होत असल्याचे विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आता आंदोलन करूनही काही फायदा होईल, असे वाटत नाही. कारण किती वेळा एकाच मागणीसाठी भांडावे, यालाही मर्यादा असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. आंदोलन करूनही पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण होते. यामुळे आता जिथे पाणी मिळेल तेथून उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे.
...तर आता थेट कारवाई होईल
विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्यामुळे १५ मे पर्यंत लागेल तेवढे पाणी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. दिवसातून तीन वेळा वसतिगृहे, विभागातील पाण्याचा आढावा घेण्याच्या सूचना आहेत. महापालिकेचे पाणी उपलब्ध झाले नाही, तरी त्यावर विसंबून न राहता लागेल तेवढे टँकर मागविण्याची परवानगी संंबंधित विभागाला दिलेली आहे.
तरीही पिण्याचे पाणी कमी पडत असेल, तर नियोजनाचा अभाव असल्याचे स्पष्ट होते. नियोजनात त्रुटी ठेवणाºया, हलगर्जी करणारे अधिकारी, कर्मचाºयांवर आता कडक कारवाईचा बडगा उगारण्यात येईल. मात्र, विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या काळात पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही. याची दक्षता घेणार असल्याचे प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

Web Title: Address of the students in Aurangabad bottle water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.