अधिक मासात जावयाचा मान; बाजारात तब्बल १ टन रेडिमेड धोंड्यांची विक्री
By प्रशांत तेलवाडकर | Published: July 22, 2023 06:04 PM2023-07-22T18:04:22+5:302023-07-22T18:05:00+5:30
शहरात २००पेक्षा अधिक महिला ‘अनारसे, धोंडे’ बनविणे व ते विक्री करण्याचा घरगुती व्यवसाय करत आहेत.
छत्रपती संभाजीनगर : पूर्वी अधिकमासाच्या महिन्यात मुलीला व जावईबापूला घरी बोलावले जात असे. लक्ष्मीनारायणाची जोडी म्हणून त्यांचा योग्य तो सन्मान केला जात असे. त्यांना स्वादिष्ट जेवण खाऊ घातले जात असे. ३३ धोंडे, ३३ अनारसे दिले जात. मात्र, आता रेडिमेडचा जमाना आला आहे. या लक्ष्मीनारायणाच्या जोडीला थेट रेस्टॉरंटमध्येच बोलावले जात आहे. एवढेच नव्हे तर रेडिमेड आणलेले ३३ अनारसे दिले जात आहेत. आता तर बाजारात रेडिमेड ‘धोंडे’ आले आहेत. तेही आकर्षक पॅकिंगमध्ये दिले जात आहेत. मग, आणखी काय पाहिजे.
याचा अर्थ असा नाही, की सर्वच जण रेस्टॉरंटमध्ये धोंड्याचा कार्यक्रम करतात. घरीसुद्धा मोठ्या थाटात आयोजन करणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. लेक व जावयासाठी खुसखुशीत साजूक तुपातील किंवा चांगल्या खाद्यतेलात तळलेले अनारसे, पुरण घालून तयार केलेले धोंडे हौसेने तयार करणाऱ्या सुगरणी सासू आहेत. मात्र, अनेक कुटुंबात नवरा - बायको दोघेही नोकरीवर असल्याने त्यांना घरी अनारसे, धोंडे करण्यास वेळे मिळत नाही. अशा कुटुंबांसाठी किंवा ज्यांना अनारसे, धोंडे व्यवस्थित करता येत नाहीत, अशांसाठी रेडिमेडचा आधार आहेच.
३३ धोंडे ३५० रुपयांत
रेडिमेड ३३ धोंडे ३५० रुपयात विकले जात आहेत. त्यासाठी आकर्षक पॅकिंग करून दिली जात आहे. पारंपरिक पद्धतीने धोंडे हे पुरण घातलेले असते. मात्र, पुरणाचे धोंडे दोन दिवसांत खावे लागतात. ते जास्त दिवस टिकत नाहीत. यामुळे रेडिमेडमध्ये खोबरे व पिठी साखर, वेलची घातली जाते. हे धोंडे थोडे जास्त दिवस टिकतात. दुकानदारांनी सांगितले की, अनारसेप्रमाणे धोंडेही तयार करून देता का, अशी मागणी अनेक महिलांनी केली म्हणून आम्ही यंदा रेडिमेड ‘धोंडे’ विक्रीला आणले.
महिलांना मिळाले हंगामी काम
शहरात २००पेक्षा अधिक महिला ‘अनारसे, धोंडे’ बनविणे व ते विक्री करण्याचा घरगुती व्यवसाय करत आहेत. काहींनी तर व्हॉट्सॲपवर याची माहिती टाकणे सुरू केले आहे. आता बचत गटांच्या महिलांनीही सुरुवात केली आहे. शहरातील दुकानदार या महिलांकडून अनारसे खरेदी करून त्यांना प्रोत्साहन देत असल्याची माहिती आशा रत्नपारखी यांनी दिली.
२ टन अनारसे, १ टन धोंडे
आषाढ महिन्यात रेडिमेड अनारसे, धोंडे, बत्तासे, म्हैसूरपाक खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. महिनाभरात सुमारे २ टन अनारसे व १ टनच्या जवळपास धोंडे विकले जातील.
- विश्वजित भावे, व्यापारी
बाजारातील सर्वसाधारण भाव
१) साजूक तुपातील ३३ अनारसे - ४०० रुपये
२) साध्या तुपातील ३३ अनारसे- ३०० रुपये
३) साजूक तुपातील ३३ धोंडे- ३५० रुपये
४) ३३ म्हैसूरपाक -२०० रुपये