आदिल दरवाजा, तटबंदीला मिळणार गतवैभव; २ कोटी २५ लाखांच्या कामाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2022 07:00 PM2022-03-09T19:00:23+5:302022-03-09T19:00:48+5:30
तटबंदीला लागून असलेल्या खुल्या जागेचा वापर समाजिक उपक्रमांसाठी करता यावा म्हणून एक स्टेज उभारण्यात येईल.
औरंगाबाद : सुभेदारी विश्रामगृहाजवळील शासकीय ज्ञान- विज्ञान महाविद्यालयाचे प्रवेशद्वार असलेल्या ऐतिहासिक आदिल दरवाजा आणि त्याला लागून असलेल्या तटबंदीची अत्यंत वाईट अवस्था झाली होती. तब्बल २ कोटी २५ लाख रुपये खर्च करून दरवाजा, तटबंदीला गतवैभव मिळवून देण्यात येणार आहे. मंगळवारी या कामाला सुरुवात झाली.
सुभेदारी विश्रामगृहाकडे जाताना जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानाला लागून मोठी तटबंदी आहे. याला किलेअर्कची तटबंदीही म्हटले जाते. शासकीय ज्ञान- विज्ञान महाविद्यालयाचे प्रवेशद्वार म्हणजे मीर आदिल दरवाजा होय. मागील अनेक दशकांमध्ये या दरवाजासह तटबंदीकडे कोणीही लक्ष दिले नाही, त्यामुळे दरवाजा मोडकळीस आला. तटबंदीही शेवटच्या घटका मोजत होती. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी या परिसराला गतवैभव मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला. डीपीडीसीमधून २ कोटी २५ लाख रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली. पहिल्या टप्प्यात दरवाजा आणि तटबंदीचे काम करण्यात येईल. त्यासाठी लातूर येथील साईप्रेम कन्स्ट्रक्शन्सला १ कोटी ५१ लाख रुपयांचे काम देण्यात आले. त्यानंतर विद्युत विभागाकडून लाईटसाठी स्वतंत्र निविदा काढली जाईल. वास्तुविशारद प्रदीप देशपांडे काम पाहत आहेत.
खुल्या जागेचा वापर सामाजिक उपक्रमांसाठी
तटबंदीला लागून असलेल्या खुल्या जागेचा वापर समाजिक उपक्रमांसाठी करता यावा म्हणून एक स्टेज उभारण्यात येईल. ओपन एअर थिएटर, विविध शिबिरे, कार्यशाळा, हेरिटेज वॉक, परेड, पोलीस बँड, एनसीसी परेड, शैक्षणिक मेळावे आदी उपक्रम या ठिकाणी घेता येतील. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने या कामाचा प्रारंभ मंगळवारी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण व पालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शहर अभियंता एस. डी. पानझडे, कार्यकारी अभियंता सुनील काकडे, प्रभाग अभियंता फारूक खान, कनिष्ठ अभियंता संतोष झापकर यांची उपस्थिती होती.