आदिशक्ती मुक्ताई सारी संकटे दूर नेई...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2017 11:49 PM2017-06-20T23:49:24+5:302017-06-20T23:50:39+5:30
बीड : पांडुरंग...पांडुरंग हरी.. आदिशक्ती मुक्ताई सारी संकटे दूर नेई यासह इतर अभंग आणि भजनात तल्लीन होत टाळ मृदंगाच्या गजरात संत मुक्ताई पालखीचे मंगळवारी बीड शहरात जोरदार स्वागत झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : पांडुरंग...पांडुरंग हरी.. आदिशक्ती मुक्ताई सारी संकटे दूर नेई यासह इतर अभंग आणि भजनात तल्लीन होत टाळ मृदंगाच्या गजरात संत मुक्ताई पालखीचे मंगळवारी बीड शहरात जोरदार स्वागत झाले. माळीवेस येथे रिंंगण सोहळ्यानंतर पालखी हनुमान मंदिरात विसावली. बुधवारी पालखीचा बालाजी मंदिरात मुक्काम राहणार असून बुधवारी संत मुक्तार्इंचे आजोबा गोविंदपंत यांच्या समाधीदर्शनानंतर पालखीचे पालीकडे प्रस्थान होईल.
सोमवारी नामलगाव येथे पालखीचा मुक्काम होता. सकाळी दहा वाजेच्या सुमारास जालना रस्त्यावर भाविकांनी स्वागत केले. रथ, बैल, घोडा पालखीचे आकर्षण होते. रस्त्याच्या दुतर्फा बाजुने महिला, पुरुष भाविकांनी पूजन करुन पालखीचे दर्शन घेतले. सुभाष रोड येथे आदर्श मार्केट व्यापारी संघाच्या वतीने फराळ, राजगिरा लाडु, केळी, आंब्याचे वाटप करण्यात आले. या वेळी आरतीनंतर मुक्ताई संस्थानचे प्रमुख अॅड. रविंद्र पाटील, दिंडी प्रमुख रविंद्र हरणे यांचा अध्यक्ष प्रकाश कानगांवकर, सचिव सुदाम चव्हाण यांनी सत्कार केला. या वेळी अॅड. सत्यनारायण लाहोटी, नामदेवराव क्षीरसागर, गंमत भंडारी, एपीआय दराडे, डॉ. लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर आदींसह पत्रकार, व्यापारी उपस्थित होते.
तर उज्वल गायकवाड, अश्विन पालसिंगणकर, रितेश कानगावकर, अविनाश कानगावकर, लक्ष्मीकांत सवाई, सुरेश मुळे, अक्षय पाडुळे, मंगेश मुळे, हेमलता पालसिंगनकर, शारदा पालसिंंगनकर, गार्गी पालसिंगनकर, अंजली मुळे, स्नेहल मुळे, आदींनी मसाला दुधाची व्यवस्था केली होती. सारडा संकुल, डीपी रोड भागातील व्यापारी, सामाजिक कार्यकर्त्यांनीही फराळाचे वाटप केले. माळीवेस येथे रिंगण सोहळ्याने उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर हनुमान मंदिरात आरतीनंतर मुक्ताई संस्थानचे प्रमुख, दिंडी प्रमुखांसह वारकऱ्यांचे विश्वस्त मंडळाने स्वागत केले. नंतर मंदिरात भाविकांना दर्शनासाठी पालखी विसावली. दुपारपासून भाविकांनी रांगेत दर्शन घेतले.
जिजाऊ धर्मयोद्धा ढोलपथक
पालखीच्या स्वागतासाठी शहरातील कबाड गल्लीतील जवळपास पन्नास युवक- युवतीचा सहभाग असलेल्या ‘जिजाऊ धर्मयोद्धा’ ढोल पथकाने तयारी केली होती. पालखी मार्गावर या पथकाची प्रात्यक्षिके आकर्षण ठरले.
चहा, फराळाचे वाटप
जालना रस्त्यावर रामेश्वर चौधरी, अमोल बहिर, अक्षय आगास यांच्यावतीने वारकऱ्यांना फराळाचे वाटप करण्यात आले. तसेच मंगलमुर्ती सर्व्हिस सेंटरच्यावतीने चहा देण्यात आला.