आदित्य ठाकरेंवर सभेपूर्वीच व्यंगचित्राद्वारे वार; अब्दुल सत्तार म्हणाले 'ते' आता जागी झाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 03:38 PM2022-11-07T15:38:06+5:302022-11-07T15:40:00+5:30
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंच्या सिल्लोड येथे सभेचे आयोजन करण्यात आल्याचे कळताच कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी त्याच दिवशी सिल्लोड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सभेचे आयोजन केले.
औरंगाबाद: कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा बालेकिल्ला सिल्लोडमध्ये खासदार श्रीकांत शिंदे आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे आज समोरासमोर येणार आहेत. मात्र, समोरसमोर येण्यापूर्वीच कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी एका कार्टूनद्वारे आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. सत्तेच्या खुर्चीवर झोपलेले आदित्य ठाकरे सत्ता गेल्यावर शेतकऱ्यांच्या बांधावर गेले आहेत, असा आशयाचे हे व्यंगचित्र आहे.
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंच्या सिल्लोड येथे सभेचे आयोजन करण्यात आल्याचे कळताच कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी त्याच दिवशी सिल्लोड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सभेचे आयोजन केले. दोन्ही कार्यक्रमांची ठिकाणे जवळ असल्याचे पाहून प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करीत आदित्य यांच्या सभेस जागा बदलून परवानगी दिली. अतिवृष्टीमुळे शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आणि जिल्ह्यातील कृषीमंत्री असूनही शेतकऱ्यांना दिवाळीचा सण साजरा करता आला नाही. शासनाने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दहा दिवसांपूर्वी गंगापूर तालुक्यात केलेल्या धावत्या नुकसान पाहणी दौऱ्यात केला होता. यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर रान पेटविण्यासाठी शिवसेना सक्रिय झाली आहे. आदित्य ठाकरे आज सायंकाळी सिल्लोड येथे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
तर दुसरीकडे अब्दुल सत्तार यांच्याकडून सिल्लोड येथील जिल्हा परिषदेच्या मैदानात श्रीकांत शिंदे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आले आहे. सभेच्या व्यासपीठावर आदित्य ठाकरे यांचं एक व्यंगचित्र लावण्यात आला आहे. या व्यंगचित्रात सत्ता असताना सत्तेच्या खुर्चीवर झोपलेले आदित्य ठाकरे समोर शेतकरी हात जोडलेला आहे तर त्यानतंर सत्ता गेल्यावर शेतकऱ्यांच्या बांधावर शेतकऱ्यांसमोर हात जोडलेले आदित्य ठाकरे दाखवण्यात आले आहे. यातून कृषिमंत्री सत्तार यांनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांना डिवचले आहे. सत्तारांचे आव्हान स्वीकारून सिल्लोडमध्ये आलेले आदित्य आता यावर कशा प्रकारे प्रतिउत्तर देता याची उत्सुकता आहे.
आता बांधावर जाऊन काय उपयोग
सत्तेत असताना आदित्य ठाकरे यांना कुठे जावे हे कळले नाही. सत्ता गेल्यास ते शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत. पण आता तिथे काही नाही. आम्ही पंचनामे केले, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली. आता आदित्य ठाकरे श्रेय घेण्यासाठी येत आहेत त्यामुळे त्यांना पप्पू म्हणतो. तसेच व्यंगचित्रामध्ये तेच दिसत असल्याचे अब्दुल सत्तार म्हणाले.