लिहून देतो, आदित्य ठाकरे लवकरच राज्याचे मुख्यमंत्री होणार; चंद्रकांत खैरेंचे भाकित
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 04:12 PM2023-09-18T16:12:52+5:302023-09-18T16:13:33+5:30
'ते आदित्य ठाकरेंना घाबरतात, ठाकरे कुटुंबाचा द्वेष करतात.'
छत्रपती संभाजीनगर: अलीकडेच(दि.16) छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत मराठवाड्यासाठी 45 हजार कोटींच्या विविध योजनांची घोषणा करण्यात आली. यावरुन विरोधकांकडून सरकारवर टीका होत आहे. दरम्यान, माध्यमांशी संवाद साधताना शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनीही या योजनांवरुन सरकारवर टीका केली. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे लवकरच मुख्यमंत्री होणार, असे भाकितही केले.
आदित्य ठाकरेमुख्यमंत्री होणार
शहरातील प्रसिद्ध सिद्धार्थ उद्यानातील वाघिणीने दोन पिलांना जन्म दिला. त्यांचे नाव ठेवण्यासाटी चिठ्ठ्या काढण्यात आल्या होत्या. यावेळी अजित पवारांनी काढलेल्या चिठ्ठीवर आदित्य नाव आले, पण ती चिठ्ठी बदलण्यात आली. यावर खैरेंना प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले की, सरकार आदित्य ठाकरेंना घाबरते. शेतकऱ्यांच्या बांधावर आदित्य ठाकरे गेले, हे गेले नाही. हे सगळे ठाकरे कुटुंबाचा द्वेष करतात. ठाकरे कुटुंबानेच यांना मोठं केलं. एक ना एक दिवस आदित्य ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होणार. लिहून ठेवा माझं वाक्य, आदित्य ठाकरे लवकरच मुख्यमंत्री होणार,' असे भाकित खैरेंनी केले.
मराठवाड्याला काही दिले नाही
खैरेंनी सरकारच्या पॅकेजवरही टीका केली. सरकारने मराठवाड्यासाठी काही दिले नाही. महापालिकेचा 850 कोटींचा प्रस्तावही मान्य झालेला नाही. चारशे कोटींचा देऊ सांगितले, पण दिले नाही. मराठवाड्यातील उबाठा गटाच्या आमदारांना काही दिले नाही. त्यांचे समर्थक आमदार आहेत, त्यांना भरपूर निधी दिला. उद्धव ठाकरेंनी सिंचनाचा मुडदा पाडला, या टीकेवर खैरे म्हणाले, यांनीच सिंचनाचा मुडदा पाडला आहे. त्यावेळी अर्थमंत्री कोण होते, आता तेच सत्तेत जाऊन बसलेत. या सरकारने मराठवाड्याला काही दिले नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.