हिमायत बागेतील सर्व रस्ते प्रशासनाने खोदले, काटे टाकले; फिरण्यास आलेल्या नागरिकांचा संताप

By मुजीब देवणीकर | Published: May 20, 2024 03:56 PM2024-05-20T15:56:47+5:302024-05-20T15:57:23+5:30

हिमायत बागेतील रस्ते खोदून ठेवल्याने नागरिकांना पायी चालणेही अशक्य झाले आहे

Administration dug all the roads in Himayat Bagh! The anger of thousands of citizens who came to walk | हिमायत बागेतील सर्व रस्ते प्रशासनाने खोदले, काटे टाकले; फिरण्यास आलेल्या नागरिकांचा संताप

हिमायत बागेतील सर्व रस्ते प्रशासनाने खोदले, काटे टाकले; फिरण्यास आलेल्या नागरिकांचा संताप

छत्रपती संभाजीनगर : ऐतिहासिक वनसंपदा लाभलेल्या हिमायत बागेत दररोज सकाळी आणि संध्याकाळी हजारो नागरिक फिरण्यासाठी येतात. प्रशासनाने शनिवारी अचानक हिमायत बागेतील अंतर्गत सर्व कच्चे रस्ते खोदून ठेवले. ते एवढ्यावरच थांबले नाही तर काही ठिकाणी बाभळीचे काटेही टाकले. फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांना त्यामुळे आत जाताच आले नाही. प्रशासनाच्या या मनमानी कारभारामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. रस्ते जसेच्या तसे न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

शहरात आता ऑक्सिजन हब उरले नाहीत, त्यामुळे हिमायत बागकडे एक मोठे ऑक्सिजन हब म्हणून बघितले जाते. वर्षानुवर्षे या ठिकाणी शेकडो आबालवृद्ध सकाळी-संध्याकाळी वॉकसाठी येतात. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी या ठिकाणी अनेकदा इतिहासप्रेमींनी वॉक कार्यक्रमही आयोजित केले.

साधारण ३०० ते ४०० वर्षे जुनी झाडे या ठिकाणी आहेत. अत्यंत प्रसन्न, शांत वातावरण असते. आरोग्य जपण्यासाठी आणि दिवसभराचा थकवा घालविण्यासाठी अनेक नागरिक येथे वॉकसाठी येतात. शनिवारी सायंकाळी नागरिक फिरण्यासाठी आले तेव्हा सर्व बाजूने खड्डे खोदून ठेवल्याचे दिसले. काही ठिकाणी बाभळीचे काटे टाकले होते. नागरिकांनी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना जाब विचारला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे नागरिकांच्या संतापात भर पडली. हिमायत बाग प्रशासनाची बाजू जाणून घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला असता ते उपलब्ध झालेे नाहीत.

कोणाच्या इशाऱ्यावर हे कृत्य?
हिमायत बाग प्रशासनाने विविध फळ विक्रीचे वार्षिक कंत्राट दिले आहे. कंत्राट घेतलेल्या व्यक्तींना हिमायत बागेत सर्वसामान्य नागरिकांनी येऊच नये असे वाटते. त्यांनी यापूर्वी अनेकदा नागरिकांना त्रास दिला आहे. त्यांच्याच इशाऱ्यावर प्रशासन नाचत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

रस्ते जसेच्या तसे करून द्या
हिमायत बागचे प्रशासन परभणी कृषी विद्यापीठांतर्गत चालते. हिमायत बाग परिसर जैवविविधतेअंतर्गत येतो. त्यामुळे रस्ते जसेच्या तसे करून द्यावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
- प्रा. मकसूद दायमी, नागरिक

संयमाचा अंत पाहू नये
सुशिक्षित आणि विविध क्षेत्रात मोठमोठ्या पदांवर असलेले नागरिक येथे येतात. वर्षानुवर्षांची परंपरा मोडीत काढणे चुकीचे आहे. हा परिसर खासगी नाही. शासनाचा आहे. नागरिकांना वॉकसाठी अडविता येत नाही. हिमायत बाग प्रशासनाने नागरिकांचा अंत पाहू नये.
- अय्युब खान, नागरिक

Web Title: Administration dug all the roads in Himayat Bagh! The anger of thousands of citizens who came to walk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.