बजाजनगरात गतीरोधक टाकण्याचा प्रशासनाला विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 09:25 PM2019-05-27T21:25:21+5:302019-05-27T21:25:51+5:30

अपघाताच्या घटना टाळण्यासाठी रस्त्यावरील मुख्य चौकात गतीरोधक उभारावेत अशी मागणी वाहनाधारकांतून केली जात आहे.

The administration forgot to keep pace in the Bajajnagar | बजाजनगरात गतीरोधक टाकण्याचा प्रशासनाला विसर

बजाजनगरात गतीरोधक टाकण्याचा प्रशासनाला विसर

googlenewsNext

वाळूज महानगर : एमआयडीसी प्रशासनाने बजाजनगरातील रस्ते गुळगुळीत केले आहेत. मात्र, या रस्त्यावर गतीरोधक तयार केले नाहीत. त्यामुळे वाहनधारक वाहने सुसाट पळवित आहेत. या भरधाव वाहनांमुळे अपघाताच्या घटना घडत असून, हे रस्ते नागरिकांची डोकेदुखी ठरत आहेत. या सुसाट वाहनांना आवर घालण्यासाठी व अपघाताच्या घटना टाळण्यासाठी रस्त्यावरील मुख्य चौकात गतीरोधक उभारावेत अशी मागणी वाहनाधारकांतून केली जात आहे.


एमआयडीसी प्रशासनाने कोट्यवधी रुपये खर्च करुन काही महिन्यांपूर्वीच बजाजनगर निवासी क्षेत्रातील रस्ते गुळगुळीत केले आहेत. पण या रस्त्यावर भरधाव वाहनांना ब्रेक लागण्यासाठी कुठेही गतीरोधक तयार केलेले नाहीत. त्यामुळे वाहनधारक या गुळगुळीत डांबरी रस्त्यावरुन वाहने सुसाट नेत आहेत. मद्यपी चालकांची संख्याही मोठी आहे.

उन्हाळी सुट्या लागल्याने यात अल्पवयीन चालकाची भर पडली आहे. भरधाव वाहनांमुळे अपघाताच्या घटना वाढत असून, किरकोळ अपघात तर रोजचे झाले आहेत.

काही दिवसांपूर्वीच येथील मोरे चौक, त्रिमूर्ती चौक, जयभवानी चौक, मोहटादेवी मंदिर आदी चौकात अपघातांच्या घटना वाढल्या आहेत. मोहटादेवी चौकात एका ट्रॅक्टरने धडक दिल्याने महिलेचा मृत्यू झाला. तर जयभवानी चौकात कारचालकाने दोन दुचाकीस्वारांना उडविल्याची घटना घडली आहे. सुसाट वाहनांना आवर घालण्यासाठी बजाजनगरात गतीरोधक उभारणे गरजचे आहे.


या विषयी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता भूषण हर्षे म्हणाले की, गतीरोधक उभारण्यासाठी काही तांत्रिक अडचणी आहेत. याविषयी लवकरच स्थळ पाहणी करुन स्थानिक पातळीवर संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करुन सकारात्मक निर्णय घेतला जाईल.

Web Title: The administration forgot to keep pace in the Bajajnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Walujवाळूज