आरोग्य समितीच्या तयारीत जुंपले प्रशासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 12:22 AM2017-10-31T00:22:07+5:302017-10-31T00:22:21+5:30
राष्ट्रीय आरोग्य समिती ३ ते ११ नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यातील आरोग्य सेवांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा दौºयावर येत आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासन स्वच्छतेसह दस्ताऐवजांची जुळवाजुळव करण्यात दंग झाल्याचे दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : राष्ट्रीय आरोग्य समिती ३ ते ११ नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यातील आरोग्य सेवांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा दौºयावर येत आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासन स्वच्छतेसह दस्ताऐवजांची जुळवाजुळव करण्यात दंग झाल्याचे दिसून येत आहे.
केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने दरवर्षी राज्यातील दोन जिल्ह्यांतील आरोग्य सेवेचा आढावा घेतला जातो. यावर्षी ३ ते ११ नोव्हेंबर या कालावधीत राष्ट्रीय आरोग्य समिती राज्यातील वर्धा व परभणी या दोन जिल्ह्यातील आरोग्य सेवांचा आढावा घेणार आहे. ही समिती जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय, जिल्हा रुग्णालयांची तपासणी करणार आहे. या तपासणीमध्ये प्रामुख्याने रुग्णालय व परिसरातील स्वच्छता, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राबविण्यात येणारी जननी सुरक्षा योजना, जननी शिशू सुरक्षा कार्यक्रम, कुटुंब कल्याण, बालकांचे लसीकरण, गरोदर मातांची तपासणी, संसर्जन्य आजार, कर्करोग, मधुमेह, रक्तदाब या योजनेत देण्यात आलेले उद्दिष्ट, झालेले काम, रुग्णांचे समाधान, १०२, १०८ या सेवांचा आढावा यासह विविध कार्यक्रम, उपक्रम गरजूपर्यंत पोहचतात की नाही, आदी बाबींचा आढावा घेणार आहे. त्यामुळे या समितीने जिल्ह्यातील आरोग्य सेवेबद्दल नाराजी व्यक्त करु नये, यासाठी गेल्या आठ दिवसांपासून जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासन व आरोग्य विभाग कामाला लागला आहे. ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांसह परभणी शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रत्येक वार्डातील स्वच्छता, जुन्या इमारतींची रंगरंगोटी, मानसिक आजार, महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना, रक्तदान आदी योजनांच्या माहिती संदर्भातील पोस्टर्स रुग्णालय परिसरात ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. तसेच रुग्णालयातील दस्ताऐवज अद्ययावत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. रुग्णालय प्रशासनाने दोन दिवस रुग्णालयातील वॉर्ड पाण्याने स्वच्छ केले. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासन आरोग्य समितीच्या दौºयाचा धसका घेऊन स्वच्छतेसह दस्ताऐवजांची जुळवाजुळव करण्यात जुंपल्याचे दिसून येत आहे.