पेट्रोलनंतर आता लस नसेल तर किराणा, मेडिकल, दारूही नाही मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2021 03:46 PM2021-11-24T15:46:35+5:302021-11-24T15:51:05+5:30
No Corona Vaccine No Alcohol : पेट्रोलपंप, रेशन दुकाने, रिक्षा, ट्रॅव्हल्स एजन्सीनंतर आता दुकाने, मेडिकल स्टोअर्सकडे प्रशासनाने मोर्चा वळविला आहे
औरंगाबाद : लस न घेतलेल्या व्यक्तीला किराणा, मेडिकल, दारूही मिळणार नाही, ( No Vaccine No Alcohol, Medicine, Grocery ) असे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काढले आहेत.
लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक पाऊल उचलली असून, त्याचे परिणाम पाहायला मिळत आहेत. पेट्रोलपंप, रेशन दुकाने, रिक्षा, ट्रॅव्हल्स एजन्सीनंतर आता दुकाने, मेडिकल स्टोअर्सकडे प्रशासनाने मोर्चा वळविला आहे. सर्व दुकानांसह परवानाधारक मद्य विक्री दुकानांत कामगारांची लसीकरणाची किमान एक मात्रा पूर्ण झालेली असावी. तसेच किमान एक डोस घेतलेल्या ग्राहकालाच यापुढे मद्य, किराणा, औषधी खरेदीची मुभा राहील. नियमांचे उल्लंघन झाल्यास अशी दुकाने सील केली जातील, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
आदेशाची अंमलबजावणी २५ नोव्हेंबरपासून करण्यात येणार आहे. किराणा दुकाने, बहु उत्पादन विक्री दुकाने व आस्थापना तसेच हॉटेल्स, ढाबे, भोजनालय, खानावळी यात कार्यरत सर्व कर्मचारी, कामगारांचे लसीकरण करून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अशा आस्थापना, दुकानात कार्यरत कामगार, कर्मचाऱ्यांनी लसीचा किमान एक डोस घेतलेला नसल्याचे आढळून आले, तर दंडात्मक कारवाईसह दुकान, आस्थापना सील करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.