प्रशासन चिंतामुक्त! जायकवाडी धरण भरतेय...सिंचन, उद्योग, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 07:31 PM2024-08-31T19:31:17+5:302024-08-31T19:31:55+5:30

या धरणातील पाण्यावर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यातील सुमारे १ लाख ८० हजार हेक्टर जमिनीवरील पिकांना पाणी देण्यात येते.

Administration worry free! Jayakwadi dam is being filled... Irrigation, industry, drinking water problem solved | प्रशासन चिंतामुक्त! जायकवाडी धरण भरतेय...सिंचन, उद्योग, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला

प्रशासन चिंतामुक्त! जायकवाडी धरण भरतेय...सिंचन, उद्योग, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला

छत्रपती संभाजीनगर : नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील लहान, मोठी सर्व धरणे आणि बंधारे काठोकाठ भरल्याने या दोन्ही जिल्ह्यातून जायकवाडी प्रकल्पात रोज पाण्याची आवक होत आहे. आगामी काळातही ही आवक अशीच राहणार आहे. आज जायकवाडी प्रकल्प ८० टक्क्यांच्या पुढे भरला असल्याने वर्षभराचा सिंचन, उद्योग आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याने प्रशासन चिंतामुक्त झाले.

मराठवाड्यातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणून जायकवाडी धरणाकडे पाहिले जाते. या धरणातील पाण्यावर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यातील सुमारे १ लाख ८० हजार हेक्टर जमिनीवरील पिकांना पाणी देण्यात येते. गतवर्षी मराठवाडा आणि जायकवाडी प्रकल्पाचा उर्ध्वभाग असलेल्या अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातही कमी पाऊस झाला होता. परिणामी गतवर्षी १५ ऑक्टोबर रोजी जायकवाडी प्रकल्पात ५३ टक्केच जलसाठा जमा झाला होता. यामुळे समन्यायी पाणी वाटप तत्त्वानुसार मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळावे, यासाठी येथील जनतेला अहमदनगर आणि नाशिकविरोधात आंदोलन करावे लागले होते. न्यायालयातही लढा द्यावा लागला होता. यंदाही मराठवाड्यात अत्यल्प पाऊस पडला आहे. यामुळे विभागातील मोठ्या, मध्यम आणि लघू प्रकल्पात अत्यल्प जलसाठा आहे. अशा परिस्थितीत मराठवाड्याची तहान भागविणाऱ्या जायकवाडीत आज ८० टक्क्यांच्या पुढे जलसाठा जमा झाल्याने आनंद व्यक्त केला जात आहे. प्रकल्पाच्या उर्ध्व भागातील लहान, मोठी धरणे आणि बंधारे शंभर टक्के भरले आहेत. पुढील संपूर्ण सप्टेंबर महिना पावसाचा आहे. यामुळे या महिन्यात पावसाचा प्रत्येक थेंब नगर, नाशिककरांना जायकवाडी प्रकल्पासाठी सोडावा लागणार आहे. यामुळे आगामी काही दिवसांतच जायकवाडी प्रकल्प शंभर टक्के भरेल, असा अंदाज कडाचे अधीक्षक अभियंता एस. के. सब्बीनवार यांनी वर्तविला.

रब्बी, उन्हाळी पिकांसाठी ४ आवर्तने सोडणार
प्रकल्प भरू लागल्याने आम्ही आजपासून माजलगाव धरणासाठी पाणी सोडण्यास सुरुवात केली. यावर्षी रब्बी हंगामासाठी तीन तर उन्हाळी पिकांसाठी ४ आवर्तने अशा एकूण सात आवर्तनातून सुमारे १५०० दलघमी पाणी सिंचनासाठी देणार आहोत. उद्योग आणि पिण्यासाठी २०० दलघमी पाणी देता येणार आहे. वर्षभरात सुमारे ३०० दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होईल. छत्रपती संभाजीनगर आणि जालना शहराचा पिण्याच्या पाण्याचा तसेच दोन्ही जिल्ह्यातील एमआयडीसीतील उद्योगांचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे.

दहा दिवसांत जायकवाडी शंभर टक्क्यांपर्यंत भरेल
जायकवाडीच्या उर्ध्व भागातील सर्वच धरणे शंभर टक्के भरल्याने नगर, नाशिककर आता पडणाऱ्या पावसाचा एकही थेंब साठवू शकत नाही. यामुळे आगामी काळात उर्ध्व भागातून जायकवाडीत पाण्याची आवक होतच राहील. पुढील दहा ते बारा दिवसांत जायकवाडी शंभर टक्के भरेल.
- एस. के. सब्बीनवार, अधीक्षक अभियंता, कडा.

Web Title: Administration worry free! Jayakwadi dam is being filled... Irrigation, industry, drinking water problem solved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.