प्रशासनाचे शहराचे सर्वंकष निरीक्षण सुरू; संचारबंदीचा निर्णय होणार सोमवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 08:19 PM2020-07-04T20:19:49+5:302020-07-04T20:22:59+5:30
शहराचे सर्वंकष निरीक्षण सुरू असून, ६ जुलै रोजी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, मनपा, पोलीस आणि जिल्हा प्रशासनाची विभागीय आयुक्तालयात बैठक होईल.
औरंगाबाद : कोरोनाचा विळखा शहर आणि ग्रामीण भागाभोवती घट्ट होत चालला आहे. त्यातच वाळूज व परिसरातील सात ग्रामपंचायत हद्दींमध्येही कोरोनाच्या रुग्णांची रीघ लागली आहे. शिस्त आणि नियमांच्या पालनातूनच कोरोनावर नियंत्रण मिळविणे शक्य असल्यामुळे शहरवासीयांना प्रशासनाने १० जुलैपर्यंत अल्टिमेटम दिला आहे.
शहराचे सर्वंकष निरीक्षण सुरू असून, ६ जुलै रोजी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, मनपा, पोलीस आणि जिल्हा प्रशासनाची विभागीय आयुक्तालयात बैठक होईल. त्यानंतर लॉकडाऊन, कर्फ्यू, संचारबंदीचा निर्णय होईल, असे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शुक्रवारी संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी, मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांची उपस्थिती होती. आयुक्त केंद्रेकर म्हणाले, संचारबंदी, लॉकडाऊनने कोरोनावर नियंत्रण शक्य नाही; परंतु रुग्णसंख्येला आळा बसू शकतो.
मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत ५० रुग्ण आढळले तरी लॉकडाऊन केले जात आहे, मग औरंगाबादला २०० रुग्ण आढळले तरी याबाबत विचार का होत नाही. जिल्हानिहाय लॉकडाऊनची व्याख्या वेगळी आहे काय? यावर केंद्रेकर म्हणाले, विभागातील जिल्ह्याचे पूर्ण अधिकार स्थानिक प्रशासनाला आहेत. परभणी, बीड आणि औरंगाबादची तुलना होणे शक्य नाही. कारण औरंगाबादमध्ये त्या जिल्ह्यांपेक्षा सुविधा मोठ्या प्रमाणात आहेत. त्या जिल्ह्यांत परिस्थिती हाताबाहेर गेली तर यंत्रणेवर ताण पडू शकतो. त्यामुळे नियंत्रण मिळविण्यासाठी घ्यावयाचे अधिकारी तेथील प्रशासनाला आहेत. दरम्यान, शहरात अचानक संचारबंदीचा निर्णय लागू करण्याऐवजी जनजागृती करून विचार होणार आहे. ६ जुलैपर्यंत शहरातील कोरोना रुग्णांची परिस्थिती आटोक्यात आली नाही, तर कर्फ्यू लावावा लागेल आणि हा कर्फ्यू साधारण नसेल. सोमवारपर्यंत औरंगाबादकरांना शिस्त पाळण्याची मुदत आहे.
वाळूजमध्ये उद्योग वगळता संचारबंदी
वाळूजसह सात गावांमध्ये उद्योग व्यवस्थापन वगळता ४ ते १२ जुलैदरम्यान कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. वाळूज परिसरात पूर्णत: कर्फ्यू लावण्याची गरज आहे. दूध पुरवठा, मेडिकल सेवा आणि उद्योग वगळता सर्व काही बंद असणार आहे. उद्योगांना जरी सवलत असली तर त्यांना कमीत-कमी मनुष्यबळात उत्पादन घ्यावे लागेल. तसेच ज्या कर्मचाऱ्यांना शहरातून वाळूजमध्ये जाण्याबाबत पासेस दिले आहेत, त्यांनाच ये-जा करण्याची परवानगी असेल, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.
परिस्थिती हाताबाहेर गेली तर लॉकडाऊन
मनपा आयुक्त आस्तिकुमार पाण्डेय यांनी सांगितले की, परिस्थिती हाताबाहेर गेली तर एक वेळ लॉकडाऊन करावेच लागणार आहे. कोरोना नियंत्रणासाठी सुविधांमध्ये कमतरता पडणार नाही. रुग्णसंख्या वाढत आहे, तरीही परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.