१५० कोटींच्या निविदा ‘रिकॉल’ करण्यास प्रशासनाची चालढकल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 12:36 AM2017-12-27T00:36:24+5:302017-12-27T00:36:30+5:30
१५० कोटी रुपयांच्या रस्त्याच्या निविदा ‘रिकॉल’करण्याचा गेम प्लॅन मनपाने रचला आहे. मंगळवारी या निविदा पुन्हा प्रसिद्ध करण्यात येणार होत्या. मात्र, मनपा आयुक्त डी.एम. मुगळीकर मुंबई येथे गेले असल्याने निविदा पुनर्प्रसिद्धीचा मुहूर्त हुकला. आयुक्त आल्यानंतर निविदा प्रकाशित करण्यात येणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : १५० कोटी रुपयांच्या रस्त्याच्या निविदा ‘रिकॉल’करण्याचा गेम प्लॅन मनपाने रचला आहे. मंगळवारी या निविदा पुन्हा प्रसिद्ध करण्यात येणार होत्या. मात्र, मनपा आयुक्त डी.एम. मुगळीकर मुंबई येथे गेले असल्याने निविदा पुनर्प्रसिद्धीचा मुहूर्त हुकला. आयुक्त आल्यानंतर निविदा प्रकाशित करण्यात येणार आहेत.
शहरातील ५० रस्ते गुळगुळीत करण्यासाठी १५० कोटी रुपयांच्या निविदा महापालिकेने दोन महिन्यांपूर्वी प्रसिद्ध केल्या होत्या. ज्या २१ कंत्राटदारांनी निविदा भरल्या होत्या, त्यातील दोनच निविदा पात्र असून, उर्वरित निविदाधारक पात्र नसल्याचे मनपा प्रशासनाचे म्हणणे आहे. सर्व निविदा पुन्हा प्रसिद्ध करण्याचा निर्णय अधिकाºयांनी मागील आठवड्यात घेतला.
‘सोयी’चा कंत्राटदार निविदा प्रक्रियेत येत नसल्याने त्यासाठी हा नवीन डाव रचण्यात आल्याचा आरोप आता कंत्राटदारांकडून करण्यात येत आहे. कोट्यवधी रुपयांच्या निविदा डोळ्यात तेल ओतून भरण्यात आल्या आहेत. या निविदा रद्द होऊच शकत नाही, असा दावा कंत्राटदारांकडून करण्यात येत आहे. मनपा प्रशासन सर्व निविदा पुन्हा प्रसिद्ध करणार असल्याची कुणकुण एका सोयीच्या कंत्राटदाराला कशी लागली. त्याने दहा-पंधरा दिवसांपूर्वीच निविदा रिकॉल होणार असल्याची भविष्यवाणी कशी काय केली होती, असा सवालही कंत्राटदार उपस्थित करीत आहेत.
निविदा प्रक्रिया कशासाठी रद्द केली हे कागदावर महापालिकेने उघडपणे नमूद करावे, अशी मागणी कंत्राटदारांनी केली आहे. प्रशासनाने एकतर्फी निर्णय घेतल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही काही कंत्राटदारांनी दिला आहे.
अजून निधीचा पत्ता नाही
१५० कोटींमध्ये महाराष्टÑ शासन मनपाला १०० कोटींचा निधी देणार आहे. महापालिकेला आजपर्यंत हा निधीही प्राप्त झालेला नाही. २३ जानेवारी रोजी शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस असून, या दिवशी भूमिपूजन करण्याचा विचारही पदाधिकाºयांचा आहे.