राजश्री उंबरेंच्या उपोषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; संतप्त मराठा कार्यकर्त्यांनी क्रांतीचौक रोखला
By बापू सोळुंके | Published: September 6, 2024 07:08 PM2024-09-06T19:08:59+5:302024-09-06T19:15:35+5:30
मराठवाड्यातील मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा, मराठा समाजाचे ईडब्ल्यूएस हे आरक्षण पूर्ववत ठेवावे आणि अन्य एका मागणीसाठी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान मराठवाडाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष राजश्री उंबरे यांनी २ सप्टेंबरपासून क्रांतीचौकात बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यातील मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा यासह अन्य मागण्यासाठी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान मराठवाडाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष राजश्री उंबरे यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस होता. या उपोषणाची प्रशासन आणि शासनाने दखल न घेतल्याने संतप्त मराठा समाज कार्यकर्त्यांनी क्रांतीचौकात रास्तारोको केला. यामुळे सुमारे ५० मिनिटे क्रांतीचौकाची वाहतूक बंद होती. शेवटी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर क्रांतीचौकातील वाहतुक सुरळीत झाली.
मराठवाड्यातील मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा, मराठा समाजाचे ईडब्ल्यूएस हे आरक्षण पूर्ववत ठेवावे आणि अन्य एका मागणीसाठी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान मराठवाडाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष राजश्री उंबरे यांनी २ सप्टेंबरपासून क्रांतीचौकात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाचा आज शुक्रवारी पाचवा दिवस होता; परंतु प्रशासनाचा अधिकारी या आंदोलनाकडे फिरकला नाही. यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास जोरदार घोषणाबाजी करीत क्रांतीचौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास प्रदक्षिणा घातली. यानंतर हे आंदोलक अचानक रस्त्यावर बसून ठिय्या देऊ लागले. आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं, कोण म्हणतेय देत नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, एक मराठा, लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की, जय, राजमाता जिजाऊंचा विजय असो अशा घोषणा आंदोलक देत होते. सुमारे ५० मिनिटे आंदोलक रस्त्यावर बसून होते. शेवटी पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांना वाहतूक पूर्ववत करता आली.
मराठवाड्यातील आरक्षणाचा प्रश्न सोडवा अन्यथा....
आम्ही मराठवाडयात सामील होण्यापूर्वी हैदराबाद संस्थानात होतो. तेव्हा तेथे ओबीसी होतो. मात्र मराठवाड्यात आल्यानंतर आमचे आरक्षण काढून घेण्यात आले. मराठा समाजाची आर्थिक अवस्था अत्यंत बिकट आहे. यामुळे मराठवाड्यातच शेतकऱ्यांच्या आत्महत्या अधिक होतात. आपल्या लेकरा,बाळांची शैक्षणिक शुल्क भरता येत नाही. आम्ही आमच्या हक्काचे आरक्षण मागत आहोत.मागणी मान्य न झाल्याास आंदोलन तीव्र करण्यात येईल.
-राजश्री उंबरे, उपोषणकर्त्या.
अन्य मार्गावर वाहतूक वळविली
आंदोलन सुरू होताच क्रांतीचौकाकडे येणारी वाहतूक उस्मानपुरा, गोपाल टी मार्गे कोकणवाडीकडे वळविण्यात आली. तर सिल्लेखान्याकडून क्रांतीचौकाकडे येणारी वाहने खोकडपुरा मार्गे अमरप्रीत चौकाकडे वळविण्यात आली. तसेच कोर्टाकडून येणारी वाहने उड्डाणपुलाचाच मार्ग वापरण्याचे सांगण्यात आले होते.