प्रशासकांनी वाजवली रेड्डी कंपनीची ‘घंटी’; ११५ घंटागाड्या जानेवारीत येणार
By मुजीब देवणीकर | Published: December 26, 2022 07:06 PM2022-12-26T19:06:28+5:302022-12-26T19:06:57+5:30
शहराच्या विविध भागांत होत असलेल्या साफसफाईची पाहणी करीत असताना काही ठिकाणी घंटागाड्या कमी असल्याचे निदर्शनास आले.
औरंगाबाद : शहरातील कचरा संकलनाचे काम करणाऱ्या रेड्डी कंपनीला रविवारी मनपा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी चांगलेच धारेवर धरले. ११५ नवीन घंटागाड्या कधी येणार, सुपर वायजर कधी नेमणार, असा जाब विचारण्यात आला. कंपनीवर कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा देताच कंपनीचे मुख्य अधिकारी मुरली रेड्डी यांनी जानेवारीत नवीन घंटागाड्या येतील, असे लेखी आश्वासन दिले.
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे शहरात रविवारी महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. अभियानासाठी महापालिकेने संपूर्ण यंत्रणा कामाला लावली होती. मनपा प्रशासक डॉ. चौधरी, घनकचरा कक्षप्रमुख, उपायुक्त सोमनाथ जाधव हे सकाळपासूनच अभियानात सहभागी झाले होते. शहराच्या विविध भागांत होत असलेल्या साफसफाईची पाहणी करीत असताना काही ठिकाणी घंटागाड्या कमी असल्याचे निदर्शनास आले.
सेव्हन हिल उड्डाणपुलाखाली स्वच्छता अभियान सुरू असताना डॉ. चौधरी अचानक थांबले. रेड्डी कंपनीचे मुख्य संचालक मुरली रेड्डी त्या ठिकाणी आले.
रेड्डी यांना पाहताच चौधरी यांनी घंटागाड्या कधी वाढवणार, असा थेट प्रश्न केला. दोन महिन्यांपासून घंटागाड्या वाढविण्यासाठी सांगितल्यानंतरही आपण त्याकडे दुर्लक्ष करीत आहात, २९२ घंटागाड्या असल्या तरी आणखी ११५ घंटागाड्या कधी येतील, असे विचारत, स्वच्छता निरीक्षकांची नियुक्ती का केली नाही, कर्मचाऱ्यांना हँडग्लोव्हज, गमबूट का दिले नाहीत, त्यांना ड्रेस कधी देणार, अशी प्रश्नांची सरबत्ती रेड्डी यांच्यावर केली. प्रशासक संतप्त झाल्याचे पाहून रेड्डींची भंबेरी उडाली. त्यांनी कंपनीवर कारवाईचा इशारा दिला. रेड्डी यांनी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात घंटागाड्या वाढविल्या जातील, असे पत्र आयुक्तांना दिले. त्यानंतर प्रशासक तेथून निघून गेले.