मनपा प्रशासक उतरले ग्राउंड लेव्हलवर; मुख्यालयात घेतली झाडाझडती, अस्वच्छतेवर ठेवले बोट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2022 12:51 PM2022-08-06T12:51:06+5:302022-08-06T12:52:37+5:30
महापालिकेच्या अत्यंत महत्त्वाच्या ई-टेंडर विभागात सर्वच कंत्राटी कर्मचारी काम करतात यावरही आश्चर्य व्यक्त करण्यात आले.
औरंगाबाद : महापालिकेतील नवनियुक्त प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी ग्राउंड लेव्हलवर उतरून काम करण्यास सुरुवात केली असून, शुक्रवारी १२ ते ३ या वेळेत त्यांनी मुख्यालयातील विविध विभागांना भेट देऊन अत्यंत बारकाईने पाहणी केली. अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबत मुक्तपणे संवाद साधला. अनेक ठिकाणी भिंती पिचकाऱ्यांनी रंगविलेल्या होत्या. जिकडेतिकडे फायलींचे ढिगारे, जुन्या लोखंडी अलमाऱ्या, अस्वच्छता पाहून त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
गुरुवारी रात्री उशिरापर्यंत प्रशासकांनी मनपा मुख्यालयात थांबून कामकाजाची पद्धत समजावून घेतली. प्रत्येक विभागाप्रमुखाला आपले पीपीटी तयार करायला सांगण्यात आले आहे. शुक्रवारी दुपारी १२ वाजता अचानक त्यांनी मनपा मुख्यालयातील टप्पा क्रमांक ३ मध्ये प्रवेश केला. प्रशासकांनी अचानक पाहणी सुरू केल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांची एकच धावपळ झाली. अनेक विभागांत अधिकारी व कर्मचारीच नव्हते.
नगर रचना विभागापासून प्रशासकांनी पाहणीला सुरुवात केली. मालमत्ता विभागाकडे जाताना पिचकाऱ्यांनी रंगविलेल्या भिंती, नागरिक, कर्मचाऱ्यांना ये- जा करताना येणाऱ्या अडचणी, रस्त्यात ठेवलेल्या लोखंडी अलमाऱ्या पाहून आश्चर्य व्यक्त केले. अस्वच्छतेबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. वाॅर्ड अभियंता काशीनाथ काटकर यांच्याकडे यावर उत्तर नव्हते. मालमत्ता विभागाचे कामकाज कशा पद्धतीने चालते, आपत्कालीन व्यवस्थापनाचे अधिकारी येथे काय काम करतात, याची माहिती घेतली. महापालिकेच्या अत्यंत महत्त्वाच्या ई-टेंडर विभागात सर्वच कंत्राटी कर्मचारी काम करतात यावरही आश्चर्य व्यक्त करण्यात आले. अतिक्रमण हटाव विभागात कोणीही नव्हते. एक इमारत निरीक्षक होते. त्यांनीच संपूर्ण माहिती आयुक्तांना दिली.
पोलीस किती आहेत, त्यांचा पगार कोण करतो, हे समजून घेतले. झोन क्रमांक १ मध्ये त्यांनी बराच वेळ दिला. मालमत्ता कर, पाणीपट्टीची बिले कशा पद्धतीने दिली जातात. जुने रेकॉर्ड कसे ठेवले आहे, स्वच्छतेसाठी किती कर्मचारी आहेत, आदी अत्यंत बारीकसारीक माहिती त्यांनी जाणून घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्त बी.बी. नेमाने, शहर अभियंता सखाराम पानझडे, उपायुक्त अपर्णा थेटे, उपसंचालक ए.बी. देशमुख, वॉर्ड अधिकारी सुरडकर आदींची उपस्थिती होती.