कौतुकास्पद! फोनपेवर चुकून आलेले २३ हजार रुपये केले परत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 01:42 PM2023-11-16T13:42:33+5:302023-11-16T13:46:45+5:30
फोन नंबर चुकला अन् दुसऱ्याच्या खात्यात गेले पैसे
गल्लेबोरगाव : फोन पेवर चुकून आलेले २३ हजार रुपये संबधित व्यक्तीस परत केल्याची घटना सोमवारी गल्लेबोरगाव येथील घडली.
खुलताबाद तालुक्यातील पळसवाडी येथील दगडू ठेंगडे यांनी त्यांच्या एका व्यवहाराचे २३ हजार रुपये फोन पे च्या माध्यमातून रविवारी दुपारी ४:३० वाजेच्या सुमारास संबंधितास पाठविले होते. पैसे पाठविल्यानंतर समोरील व्यक्तीचे नाव आले नाही. परंतु, ठेंगडे यांना संबंधितास पैसे मिळाले, असे वाटले. सोमवारी सकाळी १०:०० वाजता ठेंगडे यांना संबधित व्यक्तिचा पैसे मिळाले नसल्याचा फोन आला. तेव्हा ठेंगडे यांनी आपण पैसे रविवारी पाठविल्याचे सांगून स्क्रीन शॉट त्यांना पाठविला. तेव्हा समोरील व्यक्तीने हे पैसे आपणास मिळाले नसून, प्रकाश झाल्टे या व्यक्तीस पाठवल्याचे सांगितले. त्यानंतर ठेंगडे यांनी चौकशी केली असता प्रकाश झाल्टे हे गल्लेबोरगाव येथील व्यावसायिक असल्याचे समजले. त्यांनी झाल्टे यांना फोन करून याबाबत माहिती दिली.
झाल्टे हे तातडीने त्यांचे खाते असलेल्या बँकेत गेले. बँकेत त्यांच्या खात्यावर २३ हजार रुपये जमा झाल्याचे दिसून आले. त्यानंतर झाल्टे यांनी ठेंगडे यांना फोन करून पैसे जमा झाले आहेत, परत घेऊन जा, असे सांगितले. त्यानुसार सोमवारी दुपारी ४:०० वाजता झाल्टे यांनी ठेंगडे यांना २३ हजार रुपये परत दिले. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी झाल्टे यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले.