कौतुकास्पद! आमीर खानच्या फार्मर कप स्पर्धेत गोळेगावकरांच्या महिलांना १५ लाखाचे बक्षीस
By बापू सोळुंके | Published: March 21, 2023 04:28 PM2023-03-21T16:28:50+5:302023-03-21T16:29:24+5:30
पाणी फाऊंडेशन फार्मर कप: राज्यातील ३९ तालुक्यातील १ हजार ५०० शेतकरी गट या स्पर्धेत होते.
छत्रपती संभाजीनगर: अभिनेना आमीर खान यांच्या पाणी फाऊंडेशन संस्थेने राज्यात घेतलल्या फार्मर कप स्पर्धेत गोळेगावच्या (ता.खुलताबाद) चित्रा नक्षत्र शेतकरी महिला गटाने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. या गटाने नुसता सहभागच नाही नोंदविला तर दहा महिने अथक परिश्रम करीत राज्यात दुसरा क्रमांक पटकावत १५ लाखांचे बक्षीस मिळविले.
चित्रा नक्षत्र शेतकरी महिला गटाच्या सुनीता आढाव आणि सुवर्णा जोशी यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत गोळेेगावकरांनी २०१७ ते २०२० या कालावधीत माथा ते पायथा अशी जलसंधारणाची कामे गावकऱ्यांनी श्रमदानाने केली. यामुळे गावाची भूजलपातळी वाढली. मात्र या स्पर्धेत गोळेगावकरांना बक्षीस मिळाले नव्हते. गतवर्षी २०२२ साली पाणी फाऊंडेशनने शेतकरी गटासाठी फार्मर कप स्पर्धेचे आयोजन केले होते.
या स्पर्धेत गावातील २६ महिलांनी एकत्र येऊन चित्रा नक्षत्र महिला शेतकरी बचत गटाची नोंदणी ३१ मे २०२२ रोजी सहभाग नोंदविला. राज्यातील ३९ तालुक्यातील १ हजार ५०० शेतकरी गट या स्पर्धेत होते. गावाचे उपसरपंच संतोष जोशी यांनी त्यांना मार्गदर्शन केले आणि स्पर्धेचे समन्वयकांशी चर्चा करून महिलांना प्रशिक्षण दिले. महिलांनी ही स्पर्धा समजून घेतली. यानंतर २६ महिलांनी एकजुटीने कापूस शेती केली. कृषीशास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मातीचे परिक्षण केल्यानंतर जमिनीला आवश्यक तेवढ्याच खतांची मात्र पिकांना दिली.
जैविक किटकनाशकाचा वापर केल्याने उत्पादन खर्च एकरी केवळ १० हजारपर्यंत कमी झाला. एवढेच नव्हे तर उत्पादनातही दुप्पट वाढ झाली.गोळेगावच्या चित्रा नक्षत्र महिला गटाने सहा महिन्यात कमी खर्चात कापसाचे दुप्पट उत्पादन घेऊन दाखविल्याने या गटाला फार्मर कप स्पर्धेचे दुसऱ्या क्रमांकाचे रोख १५ लाख आणि ट्रॉफी असे बक्षीस मिळवले. १२ मार्च रोजी पुणे येथे झालेल्या एका समारंभात अमीर खान आणि मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार या शेतकरी गटाला प्रदान करण्यात आला. या पत्रकार परिषदेला उपसरपंच संतोष जोशी, प्रल्हाद अरसूळ यांच्यासह शेतकरी गटातील महिलांची उपस्थिती होती.
आवड सवड योजना राबविली
शेतकरी गटातील पाच पाच महिलांचा एक गट तयार केला. यानंतर आवड-सवड करीत परस्परांच्या शेतात जाऊन शेतीची कामे पूर्ण केल्याने मजूरांवरील खर्च वाचल्याचे आढाव यांनी सांगितले.