कौतुकास्पद ! फ्रंटलाईन कोरोना योद्ध्यांची धोका पत्करून निदानाची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 07:17 PM2020-07-23T19:17:30+5:302020-07-23T19:18:30+5:30
आठ तास पीपीई कीट घालून काम करणाऱ्या या फ्रंटलाईन कोरोना योद्ध्यांशी ‘लोकमत’ने संवाद साधत ते करीत असलेल्या निदानाची धडपड जाणून घेतली.
- योगेश पायघन
औरंगाबाद : प्रत्यक्ष कोरोनाचे रुग्ण शोधणे तसे जोखमीचे काम. त्यातही बाधित रुग्ण शोधण्यासाठी स्वॅब घेऊन काही मिनिटांत निदान करून देण्यासाठी अँटिजन टेस्ट करण्यासाठी तैनात पथकाचे काम कौतुकास्पद आहे. आठ तास पीपीई कीट घालून काम करणाऱ्या या फ्रंटलाईन कोरोना योद्ध्यांशी ‘लोकमत’ने संवाद साधत ते करीत असलेल्या निदानाची धडपड जाणून घेतली.
अँटिजन कीटद्वारे रुग्ण शोधण्यासाठी टीव्ही सेंटर येथे तैनात मनपाच्या पथक क्रमांक १० मध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. रवी सावरे यांच्या मार्गदर्शनात डॉ. प्राजक्ता साळवे, तंत्रज्ञ फहाद चाऊस, समन्वयक अक्षय अंभोरे, लिपिक शैलेश इवरकर, शिपाई कल्याण जंजाळ, फवारणी कर्मचारी श्रावण सोनवणे, माहिती संकलक शेख अमिनोद्दीन काम करीत आहेत. नागरिकांना सूचना देणे, नोंदणी, विशिष्ट क्रमांक देणे, स्वॅब घेतलेल्यांना एका ठिकाणी थांबवणे, तांत्रिक चुका टाळून वेळेवर योग्य अहवाल देण्याचे काम करताना बाधित शोधून त्यांना कोविड सेंटरला रवाना करण्याच्या कामात पथकातील सदस्य सोमवारी व्यस्त होते. पीपीई कीटमुळे होणाऱ्या उकाड्यात घामाने भिजलेले डॉक्टर, तंत्रज्ञ काम करताना नव्याने रुजू झालेल्या तज्ज्ञांनाही प्रशिक्षण देताना बाधित रुग्णांना समुपदेशनाचे काम कर्मचारी करीत होते.
जैविक कचरा संकलनाचे काम एकदिलाने
सकाळी १० वाजेपासून पथकाचे काम सुरू होते. दिवसभरात दोनशे ते अडीचशे स्वॅब घेणे, त्यातून पॉझिटिव्ह, निगेटिव्ह रिपोर्ट देणे. निगेटिव्ह लोकांना घरी, तर पॉझिटिव्ह रुग्णांना वाहनाची व्यवस्था करून त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये पोहोचवणे, या सर्व नोंदी सहा वाजता पथकाचे काम थांबल्यावर वॉर रूमला माहिती देणे. कीटच्या वापराचे विवरण, दिवसभरातील जमा झालेले बायोमेडिकल वेस्ट जमा करण्याचे काम पथकातील सदस्य एकदिलाने करीत आहेत.
- अक्षय अंभोरे, टास्क फोर्स पथक समन्वयक
समाजासाठी कामाचे समाधान : क्लिनिकच्या माध्यमातून आरोग्यसेवा केली. मात्र, फिल्डवर जाऊन करीत असलेल्या या कामातून समाजासाठी काहीतरी करतोय याचे समाधान आहे. नेहमीच्या चिकित्सालयीन कामापेक्षा कोरोनात कामाची, जगण्याची पद्धत बदलली. पीपीई कीटमध्ये आठ तास काम करणे वाटते तेवढे सोपे नाही. आरोग्यसेवा देताना स्वत:लाही संसर्गापासून वाचविण्यासाठी काळजी घेणेही तितकेच गरजेचे आहे.
-डॉ. प्राजक्ता साळवे, दंत चिकित्सातज्ज्ञ, मनपा अँटिजन तपासणी पथक