कौतुकास्पद ! युवकांच्या पुढाकाराने निराधार कुटुंब झाले आत्मनिर्भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2020 06:51 PM2020-11-05T18:51:53+5:302020-11-05T18:53:30+5:30
रोख रक्कमेसह शिलाई मशीन मिळाल्याने कुटुंबाला दिलासा
पैठण : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घरातील कर्त्या पुरूषाचे आकस्मिक निधन झाल्याने निराधार झालेल्या थेरगाव येथील जाधव कुटुंबाला महाराष्ट्र राज्य परीट धोबी युवक मंडळाने भरीव मदत करून बळ दिले आहे. युवकांनी रोख रक्कम आणि पुढील उदर निर्वाहासाठी शिलाई मशिन देऊन या कुटुंबाला आत्मनिर्भर केले आहे. संकटाच्या काळात छत्र हरपलेल्या कुटुंबाच्या पाठीशी समाजाने भक्कमपणे कसे उभे रहावे याचे उदाहरण महाराष्ट्र राज्य परीट धोबी युवक मंडळाने घालून दिले आहे.
थेरगाव ( ता पैठण ) येथील रोजंदारीवर उदर निर्वाह करणारे विठ्ठल कोंडीबा जाधव यांचा १५ दिवसापूर्वी विजेचा शॉक लागून अकस्मात मृत्यू झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी व तीन मुली असा परिवार आहे. घरातील कर्ते असलेले विठ्ठल जाधव यांच्या अकस्मात मृत्यूमुळे भूमिहीन व कुठलेच रोजगाराचे साधन नसलेल्या या कुटुंबासमोर उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न उभा राहिला होता. यामुळे जाधव यांच्या कुटुंबाला भरीव मदत मदत करण्याचा संकल्प महाराष्ट्र राज्य परीट धोबी सेवा मंडळ व युवक मंडळाने केला. यानंतर त्यांनी जाधव यांच्या पत्नी छाया यांना ३१ हजार रुपयाची मदत केली. तसेच प्राजक्ता गणेश भवर यांनी पुढील काळात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी शिलाई मशीन दिली. तर अनिल मोरे यांनी सुकन्या योजनेत एका मुलीचे प्रतिवर्ष २४०० रुपये भरण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या भरीव मदतीने जाधव कुटुंबाला दिलासा मिळाला आहे.
या उपक्रमात मराठवाडा सचिव साईनाथ हजारे, युवा जिल्हाध्यक्ष गणेशराव मढीकर, कार्याध्यक्ष आप्पासाहेब ठोंबरे, व्यवस्थापक कृष्णाभाऊ साळवे, दादासाहेब भुमरे, लॉन्ड्री संघटनेचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब धोंगडे, सचिव राजू काशीद, युवा तालुकाध्यक्ष अरुण धोंगडे, सचिव गणेश राक्षे, शहराध्यक्ष शिवाजीराव तरटे, शिवाजी मुळे, नितीन बर्वे, ज्ञानेश्वर तरटे, शहराध्यक्ष रुपेश लोंधे, हरी ढोबळे, गणेश मोरे आदींनी सहभाग घेतला.